top of page
01.jpg
4.gif
02.png

पार्श्वभूमी

चांदस वाठोडा या गावाचे संदर्भात जुन्या कागदपत्रांचे आधारे (मौजे वरुड ता.मोर्शी येथील देशमुखीची सनद फारशी भाषेत बादशहा गाजी महंमद शहा आलम) प्राप्त माहितीप्रमाणे  गावची निर्माण स्थिती परिवर्तनशिल आहे. परिवर्तनशील स्थितीमुळे संत विनोबा यांच्या 'सबै भूमी गोपाल की' या वचनाची सत्यता आमच्या चांदस वाठोडा गावच्या संदर्भात खरी दिसते. आपला देश कृषीप्रधान आहे. शेती हा देशाचा प्राण आहे. शेतीच्या अवतीभवतीचे धन म्हणजे गुरे-ढोरे तेच दैवत मानून बेल नदीचे आसऱ्याने उंच टेकडे पाहून माथेगळ जागेवर टोळ्या टोळ्याने वस्ती केली. चांदस वाठोडा या गावासभोवतीचं चांदस, वाठोडा, मुसळखेड, दाभी, हनुमानपेठ येथे त्याचे अवशेष अनेक वर्षे पहायला मिळाले. अलिकडे चांदस वाठोडा, मुसळखेड येथे वस्ती दिसते. पण दाभी, हनुमानपेठ येथे वस्ती नाही. तिथे आजही पांढरी माती असलेली पहायला मिळते. ही पांढरी माती दुसरी तिसरी काही नसून तिथे वस्ती करून राहणाऱ्या लोकांची, त्यांच्या गुराढोरासह शहर होते याची साक्ष देत आहे. आजही खेडी उजाड आहेत. तिथे वस्ती नाही. पण गाव वसले तेथे 'श्री हनुमानाची मूर्ती' तिथे प्रामुख्याने रहातेच. आजही त्या खुणा अस्तित्वात आहेत. त्यांना जिभा फुटल्या असत्या तर सारे कळले असते...

जुन्या कागदपत्रांच्या प्राप्त माहितीनुसार या ठिकाणी गवळी लोकांची केवळ वस्तीच नसून ते इथे अधिकार प्राप्त करून वतनाचे मानमरातब घेऊन गवळी लोक रहात.

"सन ९०१ फसली, मुकदम दादू गवळी वल्द जनू गवळी, सरकार तनखा अदा न कर देय. सबब वतन फरोक्त मै काळी पांढरी गय देशमुखी व देशपांडीचे पत्र मानपान वगैरे खरेदी बनाम धनवानसिंग यांचे पुत्र सोनाजी मोकदम मौजे मजकूर नदारख कुंभारे यांचा परिवार पुढे चालू असे. सोनाजींचा पुत्र देवजी याचा पुत्र नामे तुकजी यांचे पुत्र जयतजी, यांचे पुत्र ३, दादजी, रावजी, यशवंत." 

अशी ही फारशी शिक्क्याची सनद 'बादशहा' गाजी अहमदशहा आलम ! ही मुळची ४०० वर्षापुर्वीची (त्यावेळच्या) बादशहाचा सनदेची अस्सल बरहुकूम नक्कल प्राप्त असे. यात मूळपुरुष गुलाबसिंह राणा हे उदेपूरचे राणा घराण्यांतील आहेत. अर्थात राणे रजपूत हे क्षत्रिय आहेत. क्षत्रिय मानणे हे मोठ्या प्रतिष्ठेचे लक्षण त्यावेळी मानल्या जाई. राणा गुलाबसिंह यांचे वंशज चांदस-वाठोडा प्रगणे वरूड येथे वारस परंपरेने अधिकार प्राप्त करून आहेत. सनदशीर मार्गाने चांदस वाठोड्यास कुमार, कुमारे, कुंभारे अशा शब्दाने अपभ्रंश होत चालत आले.

वस्तीस्थान निवडले

बेल नदीचे दोन्ही तीरावर विशेषतः उंच उंच बोडखी जागा पाहून वस्ती थाटली. चांदसला सभोवती अशी जागा अधिक वाठोडा गाव मोठा. नदीचे पात्रात मोठे मोठे जलाशय (डोह) मुसळखेड पासून शीशीडोह, अंधाऱ्या वडाचा डोह, गारपेंडचा डोह, कुमाजी बोवाचा डोह. त्यात कुमाजी बोवाच्या डोहात तेथल्या रचनेने प्राणहानी अधिक होत असे असा इतिहास आहे. भरपूर पाणी, चारा, जंगल, गुराढोरांचे मोठे कळप, गरजा कमी, गाठीचा पैसा कमरेला कसनी बांधून सोबत वापरीत किंवा अधिक पैसा हंडेच्या हंडे जमिनीत हे “गवळी तसेच दुसरे लोक पुरवून ठेवीत." हनुमानपेठला (त्याला हुमनपेठ म्हणण्याचा प्रघात) असलेल्या शेतीत गवळ्यापासून हस्तांतरीत झालेल्या शेतीत शेतीची मशागत करतांना धनाचे हंडे सापडल्याची बोलवा त्याकाळी लोकांच्या जीभेवर होती. ती दबक्या आवाजात जुनी मंडळी सांगत. जसजशी लोकसंख्या वाढली जाई तसतशी जंगलतोड करून शेती व वस्ती वाढवल्या जाई.

chandas wathoda warud amravti maharastra

  -: संपादक गण : - 

              डॉ. एस. बी. धोटे                                  मा. ब. सेवलकर
              ना. ना. देशमुख                                  भा. शि. कांबळे
              वा. शा. देशमुख                                  सौ. प्रभा वा. देशमुख

*Our village: Adopted from book - Chandas Wathoda Krantidarshan
IMG20220812181333.jpg

कुटुंब, समाज
गांव केंद्रित
परस्पर सहभाग

समुदायाने एकत्र राहून व्यवहारिक दृष्टीने प्रगती करण्यास लोकांचा कल वाढला. त्यासाठी लोक सुधारणेस झटू लागले. चांदस-वाठोडा या दोन गांवच्या रचनेत तुलनात्मक विचार केल्या जाता वाठोडा गांव मोठा. (चांदस लागून) दोन्ही गावाला सभोवती नागफणीचे काट्यांचे काटकुंपण. रस्ते अरूंद, फसणीचे, घसरणीचे, बोरांगाचे नाव घेऊन सभोवतालच्या गावांशी संबंध साधण्यास व शेतीभातीच्या व्यवहारासाठी ये-जा करण्यास मोकळे अशी ती वहिवाट होती. वाठोड्याला जागेचा तेवढा पैस' नसल्याने शेती लागून असल्याने मर्यादित रूपात वस्ती झाली. चांदसला भोवती भराटबन, नागफणीचे बेटं, ओघळ आणि उत्तरेकडे नदीकाठाने कड्याप्रमाणे उंचवटे. सिमेत वस्ती करून बाकी माळरान होतं. दोन्ही गावांत खेटूनच वस्ती मोजकीच. मंदिरे, वाठोड्यास दोन हनुमान मंदिरे. चांदसला एक हनुमान मंदिर. गांवच्या रोगराईसाठी पाठराखणी करण्यास "माता माय व मरी माय" यांचे गांवातील भोळ्याभाबड्या लोकांच्या भावनेतील श्रद्धास्थान ठाण मांडून दोन्ही गांवात हटकून आहेतच.

रहदारीचे मार्ग

पूर्वेकडून आमनेर, ढगा, एकदरा, दक्षिणेकडून घोराड, उत्तरेकडून सावंगी असे वाठोड्यांतून बोरांग रस्ते. चांदसला पश्चिमेकडे वरुड-राजुरा शेकापूर रस्ता. दक्षिणेस उदापूर, उत्तरेस सावंगी, पुसला, दाभी, शेंदुरजनाघाट, धनोडी हे रस्ते अडचणीचे, आडवळणीचे, पण तेच गावच्या पाचवीला पुजले होते. इकडे वाठोड्यास पूर्वेस 'मुंज्यानाला' या भागावर झाडी, शिंदबन तर तिकडे चांदसच्या पश्चिमेस वरुड-राजुरा रस्त्यावर झाडी-शिंदबन होते. या दोनही भागात वाटमारीचे, वाट अडवणुकीचे, प्रकार होत. लोक त्यातूनही धैर्याने जिंदगी करत. मुख्य रस्ता म्हणून वरुड-आमनेर पश्चिमेकडून चांदसमधून, वाठोडा (नदीतून) पुढे चालू असायचा तर राजुरा रस्ता महत्त्वाचा बाजार म्हणून वाठोडा-चांदसमधून राजुरा येथे लोक जायचे. हे दोनही रस्ते त्यावेळी एक अग्निदिव्यच होते. गावालगत रहदारीच्या या रस्त्यावर बाजूला उकीरडे-मलविसर्जनासाठी लोक त्या जोगचा उपयोग करीत. अशी ओळख प्रत्येक खेडे आले रे आले याची साक्ष देई.

02.jpg

वतनाच्या तुकड्यासाठी रस्सीखेच

गवळ्यापासून वतन मिळाल्यावर आपला जम व अधिकार मानमरातब येणेप्रमाणे विभागले होते. देशमुखीची वतनदारीची सनद पाहता देशमुखीची वतने सुमारे दोन हजार वर्षापासून यातून झाली आहे.

देशमुख - प्रत्येक देशाचे अनेक पोटभाग असून त्या पोटभागाला देश किंवा परगणा म्हणण्याची वहिवाट असे. परगण्याच्या मुख्य अधिकाऱ्यास देशमुख म्हनत असत. प्रत्येक घरगण्यात २५ पासून ५०० मौजेचा (खेड्यांचा) समावेश असे. अशा प्रत्येक परगण्याचे जमाबंदीचे ठराव सरकारी मुलकी अधिकारी देशमुखांच्या सहीने प्रत्येक गावच्या पाटलामार्फत प्रत्येक कुळाच्या शेती परेतीची आणि वार्षिक उत्पन्नाची शहानिशा करून घेण्याचे काम देशमुखांच्या सही शिवाय होत नसे. या महत्त्वाच्या कामगिरीबद्दल देशमुखांना भरपूर इनाम जमिनी असत पण इंग्रज सरकारने ती इनाम जमिनी पद्धत बंद केली. या बदल्यात नगदी वेतन पेन्शन अँक्टप्रमाणे देण्याची वहिवाट सुरू केली. त्या वेतनास लवाजमा' म्हणत. लवाजमा हा शब्द सैन्य बोधक आहे. राजा अथवा बादशहा यांचे सहाय्य स्वार व शिबंदी ठेवून देशमुख करीत.

 

परगण्याचे बंदोबस्तास काही स्वार व शिबंदीही राहत असे आणि परगण्याचे प्रतिकारार्थ किल्लेवजा गढी पांढऱ्या मातीची रहात असे. (आलिशान रेसिडेंट साहेब यांचे बुक सरक्युलर नंबर २१ सन १८५३ यात इंग्रजी अमलातील देशमुखी हक्क अधिकार 'दर्जा व रूसूम' या संबंधाने खुलासा केला.) त्यात देशमुखांना परगणा ऑफिसर म्हटले आहे. देशमुखीच्या वतनदारीच्या सनदेवरून देशमुखीची वतने सुमारे दोन हजार वर्षापासून चालत आली आहेत.

 

पाटील - हा गावचा मुख्य अधिकारी, बारा बलुतेदार, बारा बलुतेदार मिळून चोवीस कांरू-नारुं कुळाचा पती प्रत्येक गांवच्या पाटलाचे संरक्षणासाठी काही घोडेस्वार व शिपाई असत. प्राचीन काळच्या धामधुमीच्या काळात त्यांच्या राहण्याच्या घराला संरक्षण म्हणून गढी असे. पण इंग्रज काळापासून ते वतन नामधारी झाले. (कारण इंग्रजांच्या काळात शांतता आहे म्हणे.)

अस्तित्वास
लढा

याप्रमाणे वतनाच्या हक्कासाठी ओढाताण असायची.
आपले वऱ्हाडचे चार जिल्हे :
१) बुलढाणा २) अकोला ३) अमरावती ४) यवतमाळ हे निजामाच्या ताब्यात होते. इंग्रज राजवटीत जुन्या मध्यप्रांताला जोडले गेले. म्हणून त्याला 'मध्यप्रांत वऱ्हाड' असे संयुक्त नाव पडले होते. ​ त्या वऱ्हाड प्रांतात आपल्या गांवला देशमुखी व पाटीलकी हे दोन्ही अधिकार एकत्रितपणे फेर पाळीने उपभोगत.

 

चांदस गांवात दोन पाटील, त्यांचे वेगवेगळे दोन पोळे (बैलाच्या सणाच्या वेळी) एक पोळा माता माय पासून दक्षिणेकडील भागाकडे. कै. बापूजी भिकाजी देशमुख यांचा आणि दुसरा पोळा त्याला लागून उत्तरेकडे कै. बळीरामजी भगवंतराव देशमुख यांचा पोळा. त्यांचे सांचे त्यात कास्तकार. तीच स्थिती वाठोडा या गावातही होती. गांवचे उत्तरेस कुमाजीबुवाचे डोहाचे पूर्व तिरावर कै. मारूतराव चोबितकर यांच्या खटल्याला मानणारे कास्तकारांचा पोळा, वाठोडा विठ्ठल मंदिरासमोर नदीच्या पूर्व तिरावर वाठोडा येथील कास्तकारांचा जे. कै. रामराव गणपतरावजी देशमुख यांचे वर्तुळातील लोकांचा असे.

दिशा आणि संकल्प

गावात सुधारणांचे वारे निर्माण झाले. समाज सामाजिक-धार्मिक क्षेत्रात (राजकीय बाबतीत तेवढी दृष्टी नव्हती) सुधारणेच्या मार्गावर यावे म्हणून दोन्ही गावास मिळून एकत्रपणे चांदसला मुलांना शिकण्यास गावठी शाळा  काढली. ती अंदाजे १८९० चे सुमारास असावी. बक्षी नामक ब्राह्मण गुरुजी शिकवत. सदरहूं वर्ग चांदसलाच माता मायचे (देवीचे) उत्तरेस नदीकाठी भरत असत. विद्यार्थी संख्या जेमतेम असायची.

चांदसला नवीन गावठाणचे जागी सोयीप्रमाणे क्रमाक्रमाने शिक्षणाच्या सोयीचा विस्तार केला. शिक्षणासाठी सभोवतालच्या खेड्यातून फसणीतून, गाऱ्यातून मुले येत. आडवळणीचे रस्ते तुडवित जीवनास वळण देण्यास शिक्षण घेत. पण तेव्हा शिक्षणाचा तेवढा प्रसार नव्हता.

पुरामुळे नवे गांवठाण निर्माण

त्याच सुमारास मोठा पूर आला, पुराचे पाणी पायलीने मोजत. नदीमायला शांत करीत. पुराचा चांदसला जास्त धोका बसला. उंटाचा गोठा वाहून गेला. पुढे हनुमानाचे मंदिरापासून उत्तरेकडे नव्या गावठाणासाठी जागा मिळाली.

 

त्या सर्व जागी अधिकारपात्र लोकांनी सोयीप्रमाणे आपल्या ताब्यात जागा ठेवून तिथे गोठे, इतर बांधकाम केले. शिवमंदिराची वास्तू, शाळेसाठी आवश्यक तितके बांधकाम करण्यास जागा ठेवली. गावाच्या बाजारासाठी जागा, व्यायाम मंदिरासाठी तरुणांचा उत्साह वाढवण्यास जागा राखून ठेवली. मातामायने मंदिरापासून हनुमान मंदिराचे सीमेपर्यंत नदीचे पश्चिम तीराकडून वस्तीस पुराचा धोका पोहचू नये म्हणून दुहेरी धक्का बांधून घेतला. जेणेकरून गाव व हनुमान मंदिर यांना संरक्षण मिळाले. तिकडे उत्तरेस मातंग व इतर दलित वस्ती झाली. (त्या कालानुरूप)

 

तिकडे वाठोड्यास बाभुळखेडा ही नवी वस्ती पूर्वेकडच्या हनुमान मंदिराचे होळीचे मैदान नावाने प्रसिद्धी असलेल्या भागाचे पाणलोट प्रवाहाचे काठाने उत्तर-दक्षिण पडीत जागी निर्माण केली.

चांदसला शिवमंदिर झाले

विधिवत अस्पृश्यांसाठी शिव मंदिर खुले झाले

दि. २६.१०.१९४७ साली अस्पृश्यांना देवळे खुली करावी या आंदोलनापायी हे शिवमंदिर कै. प्रयागराव  देशमुख यांनी ट्रस्टी नेमून कै. विठ्ठलराव गणपतराव देशमुख या धडपड्या व्यक्तीचे सूचनेने लोकार्पण केले. त्या ट्रस्टीचे कै. वि. ग. देशमुख हे सचिव झाले आणि २६.१०.१९४७ ला सुमुहूर्तावर  आचार्य भन्साळीजी या गांधीवादी तपस्व्यांचे हस्ते ते 'शिव मंदिर' यथोचित सोहळ्याने हरीजनासाठी खुले केल्या गेले. (दुर्दैव की ३० जानेवारी १९४८ ला गांधीजींची हत्या झाली होती.) तेव्हापासून ते शिवमंदिर ट्रस्टी सांभाळत आहे. त्या मंदिराचे पावित्र्य राखून व भरभराट होत राहो हीच सदैव  गांवची इच्छा आहे. कारण गावासाठी ते एक प्रेरणास्थळ आहे.

चांदसला नव्या गावठाण जागेत शिव मंदिर स्थापनेसाठी चांदसचे देशमुखांनी कंबर कसली. कामाची दिशा ठरवली. जातीने कारभारी मंडळीने हजर राहून बांधकामाचे साहित्य जुळवले. (चुना-माती-रेती) वडर गवंड्याचे हाताने दगड तासल्या गेले. योग्य आकारचे चीरे-कल्पकतेने रेखीव गोट्यावरील मूर्त्या कोरल्या गेल्या. याकामी गावातील कलाकारांचे हात रात्रंदिन राबराबले गावचे कै. बळीरामजी घाटोळे कै.आण्याजी मिस्त्री इंगळकर सिरजगांव निस्ताने येथले (तालुके मोशी) 'तानदेव' बुवा यांनी परिश्रमपूर्वक देऊळ बांधले. टाकीचे घाव सोसल्यावाचून देवपण नाही म्हणतात तसे देवाचे देवालय उभे झाले. मूर्तिकाराला मूर्ती तयार करण्यास घाम आणि रक्त गाळावं लागलं. 'श्रमाचा घाम तिथ देवाचे नाम' हा मंत्र त्यांनी घेतला होता. याकामी कै. बळीरामजी तात्याजींनी जीव ओतला.

 

मंदिराचे व्यवस्थापनासाठी स्वतःची काही एकर शेती कै. बळीरामजी तात्याजीनी दान दिली. देवकात सनई-चौघडा रोज दिवा लागणीचे वेळी सायंकाळला वाजला जावा म्हणून मातंग लोकांना ही शेती दान करून दिली. कित्येक वर्षपर्यत वनात नेमाने त्याप्रमाणे सनई-चौघडा वाजे. त्याच्या बदल्यात आजही मातंग समाजाचे वारसदार परंपरागत शेताचे मालक झालेत. पण देवळात अलिकडे चौघडा वाजणे मात्र बंद पडले, "कालाय: तस्मै नम:" म्हणतात ते हेच.

 

देवळाचे निर्माणानंतर भक्ती युक्त भावनेने 'हटयोगी' एकहाते महाराज देवळाचे समोर पूर्वेस महाद्वारावर गवताची झोपडी बांधून राही. सकाळचे ध्यान धारणेनंतर एका पायावर उभे राहून एक हात उंच करून साधना करीत. एक हात सदैव वर असल्याने त्या हाताचे रक्त कमी होऊन तो हातच कामातून गेला. म्हणून त्यांना एकहाते बुवा किंवा एकहाते महाराज म्हणत, आलेल्या महापुरात त्या हटयोगी बुवांची गवताची झोपडी गेली असे पिढीतील कै. गणपतराव देशमुख हे स्मरणाला पीळ देऊन आम्हास आवर्जून  सांगत. त्या जागेवर चिरेदार कातीव दगड आजही आहेत.

कलागुणाचेसाठी शिव शिवणारे हात करी संकटावर मात

गांवास हात मळके बहाल करून उजळ मनाने, उथळ माथ्याने श्रमदानाने वास्तु निर्माण करण्यास तत्कालिन तरुणाई पुढे आली. “महापुरुष होताची पुढती दुनिया येते मागे'' या वचनानुसार गावात कै. आनंदराव चोबितकर हे चळवळे नेतृत्व 'चमचमीत चंचीची चव चाखत' पुढे आले त्यांनी' शरीर बलवान तर मन बलवान' हा मंत्र घेऊन व्यायाम शाळेची कल्पना त्यांनी पुढे आणली. अनेक तरुणाचे हात कामास लागले. दाभीचे जंगलातून मोहाची मयालीसाठी मोठी लाकडे, दगड माती आदी साहित्य आणून श्रमदानाने बलभीम व्यायाम मंदिर म्हणून, आखाड्याचे नावावर निर्माण केले. या वास्तुची स्थापना स्वामी शिवानंद महाराज वरूड यांचे हस्ते झाली. के. बळीरामजी तात्याजींनी जागा दिली. श्रीमंत बळीरामजी देशमुख यांचे अधिपत्यातील जागा ज्याला आखाडा म्हणून संबोधित असत तेथे लेझिम, लाठीकाठी, मलखांब, कुस्ती आदि व्यायामाचे प्रकार होत असत. दंगली कुस्त्यांच्या स्पर्धा होत यासाठी सभोवतालचे पहेलवान भाग घेत असत. त्यात अनेक कुस्तीगीर दोनही गावातील आपले नाव राख्नचमकलेत्यात कै, महादेवराव चोबितकर, कै. पर्बतराव कनाठे, कै. शामराव काका निंबूरकर, कै. महादेवराव बोंबले, कै. पर्बतराव दळवेकर हे मल्ल म्हणून नावाला चढले गेले. गणपती उत्सवात झुल्यावरची कामे, गांधी जयंतीला प्रभातफेरी, ग्राम सफाई हे उपक्रम स्व. आनंदरावजी चोबितकर उर्फ महात्माजी हे वय १० ते १४ वर्षाच्या मुलापासून दरवर्षी करून घेत असत. यामुळे चांदास वाठोड्याचे नाव तालुक्यात अग्रक्रमावर होते. महात्माजींच्या प्रयत्नाने प्रायमरीचे मिडलस्कूल मध्ये रूपांतर झाले यासाठी त्यांचा सिंहाचा वाटा आहे.

कालांतराने कै. विनायकराव उर्फ तात्यासाहेब देशमुख यांनी श्री. विठ्ठलराव शामराव देशमुख (टोपणनाव विठ्ठलमूर्ती) गाव सरपंच असतांना सरकारी निधी मिळवून जुन्या आखाड्याचे रूपांतर नविन व्यायाम शाळेचे वास्तूत केले. पण देवळात देव नसावा तशी त्या व्यायाम शाळेकडे तरुणाईने थोडी पाठ फिरवली व त्यामुळे तिच्या वैभवात भर पडण्यास खंड पडला. तरी पण काही शौकिन तिला आज जपतात.
 

प्रगतीला वाव आहे या कल्पनेतून भविष्यावर गावकऱ्यांच्या नजरा खिळल्या गेल्या आहेत. (अल्ला जाणे क्या होगा आगे ?) नावाने शिवमंदिर घडले खरे पण दोनही गांवचे दृष्टीने ते देऊळ तो त्याचा बाजार परिसर, व्यायाम मंदिराचा पूर्व भाग म्हणजे 'मंतरलेल्या मैदानाचे मानचिन्ह !' गावचे उत्सव, गावचे समस्त कलागुणांचे प्रदर्शन, नाटके, सर्कशीचे खेळ घडविणारी व गांवाच जिवंत दर्शन घडविणारी ती प्रेरणादायी भूमी होती. वाठोड्यासही विठ्ठल मंदिर उभे करून भक्तीचा दिवा लावला.

IMG_20200710_074313.jpg

सेवा सहकारी सोसायटीचे निर्माण

धान्य, साखर, कपडा, रॉकेल वगैरे जीवनावश्यक वस्तू लोकांना रास्त भावाने मिळाव्या म्हणून गांवात कंट्रोलचे दुकान उघडले. कारण लोकांना वरील वस्तूसाठी वरुड. एकदरा येथे चिखल तुडवित जावे लागे. इतःपर पुरेशा वस्तू मिळत नसत. "ढेप-मोह-बरबटा खाऊन धान्याचे अभावी लोकांना आपली गुजराण करावी लागे." ती दशा संपविण्यास सेवा सहकारी सोसायटी निर्माण करण्यास कै. विठ्ठलराव गणपतराव देशमुख, कै. एम.टी. देशमुख, कै. एन. डी. देशमुख यांनी अथक परिश्रम घेतले. आजही ही संस्था र.नं. १11७ अन्वये कार्यरत आहे.

ब्रँचपोष्ट ऑफीसचे निर्माण (शाखा प्रेषणालय)

याआधी वरुड हे गांवचे पोष्ट होते. या भागात आमनेरपर्यंत पोष्ट ऑफीस नव्हते. ब्रँच पोस्ट ऑफिस या भागात उपडण्याच्या हेतूने पाहणी करण्यास आले. ते सुदैवाने कै.बंड हे मेलओहरसियर होते. त्यांची भेट कै. एन.डी. देशमुख भाऊसाहेब यांच्याशी झाली. ते दोघे जुने वर्ग मित्र होते. त्यांनी ब्रँच पोस्ट ऑफीस चांदस-वाठोडा येथे उघडण्यास परिश्रम घेतले. पहिले बी. पी. एम. म्हणून कै. कृष्णराव सिताराम कावडकर हे होते.

संघ शक्ती महाशक्ती

देवदर्शनाला देवळात लोकांचे येणे. धार्मिक उत्सव घडवणे. त्यात विविध कार्यक्रम गांवातूनच काही कलेसाठीच जीवन अर्पण करणारी माणसे करीत. लोक कला जपत ! कथेकरी बुवा म्हणून कै. शंकरराव कान्होजी दळवेकर बुवा आपल्या कलेने कधी डफ, तर कधी 'डायका' तुणतुणे याच्या मोहक लयबद्ध साथीने तासन् तास लोकांची करमणूक करीत. त्यांच्या कार्यक्रमाच्या तारखा लागत. नाट्यकलेखातर गावातील जुन्या काळचे मंडळींनी केलेले पहिले नाटक राजा हरिश्चंद्र हे कै. बळीरामजी तात्याजींनी पाण्यासारखा पैसा ओतून वठवले. नाट्यकलेचा पाया रोवला. त्यांनी नाटकासाठी केलेले पडदे, कपडे, पुढच्या लोकांना कित्येक वर्ष पुरलेत. ते साहित्य नाट्यकला वाढवा हे बजावत राही.

नाटक कंपनी निर्माण

त्यातूनच पुढच्या लोकांनी गिरणीवाला, सिंहाचा छावा, धर्मवीर संभाजी, उमाजी नाईक, जनता जनार्दन अशी प्रसिद्ध नाटके गावोगावी जाऊन गाजवली. त्यात कै. रामराव दादा (दाआजी) व कै. आनंदराव चोबितकर यांचा सिंहाचा वाटा असे. नाट्यकलेचा पाया त्यांनी रोवला.

7.jpg

वाठोड्याचा दाआजीचा वाडा म्हणजे ज्ञान गाडा !

रामरावदादा निरनिराळया कलेचा पारखी म्हणून कै. दादाजींची ख्याती होती. ते प्रसिद्ध कलाकारांचे गावात कार्यक्रम घडवित मातुरकर शाहिरांचे राष्ट्रीय पोवाडे, प्रो. राममूर्तीचे शिष्य विश्वमूर्तीचे शक्तीचे प्रयोग, दलाल बुवांचे किर्तन, शिव शाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची शिव व्याख्यानमाला, जयराम शिलेदारांची नाटक कंपनी आणून तिची प्रसिद्ध नाटके या खेड्यात लोकरंजन करीत.'न भूतो न भविष्यती' अशी ती आगळी वेगळी कलेची मेजवानी देत.

कर्मवीर कै. भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांनी श्री. शिवाजी शिक्षण संस्थेची वरुडला शाळा स्थापली. त्यावेळी कै. रामराव दाआजींनी शिक्षण प्रेमापायी भरपूर देणगी दिली. त्यांचा वाचनाचा व्यासंग दांडगा त्यातून श्रीराम वाचनालय निर्माण झाले. तेथला कागद वाण दुकानचा सौदा बांधणारा नव्हता तर वंशावळी बोलकी करणारा कालकुप्पीचा शिलालेख होता. कर्मवीर डॉ. पंजाबराव देशमुख, कै. भाऊसाहेब हिरे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, गाडगेबाबा या ज्ञानवंताची पायधूळ त्या वाड्यात जतन झाली. त्यातून ज्ञानलालसेची त्यांची तथा गावची स्वप्ने रंगली. त्यांचा आदर्श पाहून अनुकरण करणारी गायक, वादक, हरहुन्नरी मंडळी पुढे आली. त्यांनी 'आपली कला पोट भरण्यासाठी जपली नाही तर जीवनभर त्यांनी कलेची सेवा केली.' या कलाबाजात कै. आत्मारामजी दवंडे काका जे मुंबईहून मूर्तीकारिता शिकून आले होते ते गणपती मूर्ती इतर मूर्ती हुबेहूब बनवित त्या मूर्तिद्वारे राष्ट्रीय भावना वाढविण्यास त्यांचा हातखंडा होता.

लोककला रंजनासाठी जलसा आणि दंढार

लोकांची करमणूक करणे ही बाब दुष्यम पण राष्ट्रीय जलसा-दंढारीद्वारे चालवून राष्ट्रीय भावना लोकामध्ये निर्माण करण्यास प्रसंगाची निर्मिती करून नाट्यीकरण करण्यात कै. लक्ष्मणराव धामंदे यांची जलसा कंपनी तरबेज होती. प्रेक्षकांना त्यांच्या कार्यक्रमाचे आकर्षण वाटे. जनसामान्याचे मनावर त्याचा पगडा कोरल्या जाई. गावातील बाल गंधर्व म्हणून गणल्या गेलेले नाट्यवेडे के. जयश्रीराम देशमुख, संगीतप्रेमी के, पर्वतराव पवार, के, भैय्याजी खाडे हे सत्यशोधक समाजाच्या प्रचार कार्यात समाजसुधारणेचा वाटा घेत. सन १९०२ साली मौजे वाठोडा येथे 'नारो बावाजी महाधट' यांचे अध्यक्षतेखाली कै. गणपतराव देशमुख वाठोडा व कै. गिरीधरराव देशमुख, टेंभूरखेडा यांनी या सत्यशोधक समाजाच्या कामाचा प्रचार चालवला होता. तो तेव्हाही चालू होता.

सांस्कृतिक कार्य

सांस्कृतिक सेवा कार्यात लोकांत चैतन्य खेळवल्या जाई. गावात त्या चळवळीद्वारे ब्राह्मणेतर पक्षाची मुहूर्तमेढ रोवल्या गेली. यासाठी दाआजींनी त्यांचे चिरंजीव नुमाजी उर्फ बाबासाहेब व्यवहारिक नाव विठ्ठलराव यांचा मौज संस्कार वेदोक्तरितीने निर्विघ्न पार पाडला. याकामी कै. कृष्णराव जोशी वाठोडेकर, रामभट बुवा गाडेगांवकर, जि. बैतुल चिंचभवन बेडेकर उमरावती यांचे हात लागले. हे कार्य कै. गणेश भटजी भाटवडे काशी दशाश्वमेघ तेढी निब यांचे हस्ते व्हावयाचे होते पण ते दुसऱ्या दिवशी आल्याने त्यांची हजेरी उशीरा लागली. (ता. २१.५.१९२८) याचा उल्लेख करण्याचे कारण की त्याकाळी मानमरातब-बडेजाव दिसावा म्हणून हा व्रतबंध केल्या गेला.

20200927_072017.jpg
CW.jpg
Screenshot 2023-05-13 at 5.24.04 PM.png

जिल्हा कौन्सिल तालुका बोर्ड रद्द होऊन जनपद सभा आली

तालुकाबद्ध राजकारणाची व्याप्ती ठरवून नव्याने कै. द्वारकाप्रसाद मिश्रा या मंत्री महोदयांनी जनपद सभा स्थापन केल्या. त्या जनपद सभेचे आपल्या गावाचे कै. विठ्ठलराव रामराव देशमुख चांदस सरकार नियुक्‍त सदस्य म्हणून जाहीर झाले. त्यांच्या .बापाचा वारसा घेऊन ते पहिले जनपद सदस्य झाले. सोबत चेर डार दौलतराव ठाकरे आणि कै. डॉ. बाबुराव पाटील हेही जनपद सदस्य होते. श्री. वि.रा. देशमुख चांदस यांचा कामाचा झपाटा दांडगा होता. म्ह्णून त्यांना विठ्ठलराव जनपद' अशा नावानेच लोक संबोधत. त्यांनी त्यांच्या कार्यकाळांत शाळेची उत्तरोत्तर प्रगती केली बेसिक एज्युकेशन अंतर्गत शाळेतून बुनियादी माध्यमिक शाळा हे नाव देऊन शाळेचा दर्जा सुधारला. सूत कताई हॉल - शेती कामास बैलाचा गोठा, बैलजोडी, चरखे, टकळ्या, हातमाग सारे उपलब्ध हेते. या शाळेला हनुमानपेठ जवळील गावरान, शेतीज्ञान विद्यार्थ्यांना व्हावे म्हणून दिल्या गेले होते. पुढे ते कृषी विद्यापीठ मागणीसाठी वरुडात जे आंदोलन झाले त्यात एक देवघरे विद्यार्थी मरण पावले. त्यातील एका पालकास मालकीने दिले. ते तेव्हा शाळेपासून काढल्या गेले.

सामाजिक परिषदांचे लोक शिक्षणासाठी आयोजन

समाज परिषदा जांब, अल्लार आदी ठिकाणी होत. तशाच प्रकारची समाज परिषद चांदस-बाटोड्यास घेतली. त्या परिषदेमध्ये श्रीमंत राजे रघुजीराजे भोसले सरकार नागपूर आले. स्वागतार्थ कै. आनंदराव चोबितकर यांनी 'जगी हा खास वेडयाचा'। गीताच्या चालीवर स्वागतगीत गाईले. राजेसाहेबांनी भाषण दिले. उद्देश पर एकच की स्वतःचा संसार शिरावर जरी असला तरी आपल्या शिरावर लोकांचाही संसार आहे याची जाण लोकांना निर्माण व्हावी व त्याच्याशी लोकांनी बांधीलकी ठेवावी या उद्देशासाठी या कार्यक्रमाचे आयोजन होते. स्थानिक स्वराज्य संस्थेमार के. जिल्हा कौन्सिल अमरावतीचे अध्यक्ष के. बी.एम. देशमुख उर्फ बापूसाहेब म्हणून आमंत्रित केले होते. प्रांतिक स्वायत्ततेचे वारे आले.

 

सन १८७० मध्ये सत्तेच्या विकेंद्रीकरणाला महत्त्व दिले म्हणून या स्थानिक स्वराज्य संस्थेचा पिता 'लार्ड मेयो' यांना म्हणतात. १८८२ मध्ये लार्ड रीपन यांनी काही महत्त्वाचे ठराव संमत केले. पुढे १९०९ मध्ये ग्राम हे प्रशासनाचे केंद्र मासूम स्थानिक स्वराज्य संस्थाचे अधिकार वाढवण्याचे ठरले. विशिष्ट पातळीपर्यंत शेतसारा भरणाऱ्या शेतकऱ्यांना व व्यापाचन मतदानाचा हक्क मिळाला. त्यानुसार जिल्हा लोकल बोर्डाचे माध्यमातून रस्ते शाळा अशी कामे व्हावयास लागली. पुढे १९३७ मध्ये प्रांतिक स्वायत्ततेनुसार स्थानिक स्वराज्य संस्थेचे सर्व सदस्य जनतेने निवडून द्यावयाचे असा बदल करण्यात आला. त्यात जिल्हा कौन्सिल (बोर्ड) सदस्य म्हणून चांदसचे रामराव तुकारामजी देशमुख उर्फ बापूसाहेब निवडून आले. त्यांच्या कारकीर्दीत चांदस वाठोडा येथे मराठी माध्यमिक शाळा सुरू झाली. नविन खोल्यांचे बांधकाम करून शाळेची सुधारणा केली. लागोपाठ दोन सत्राची कारकीर्द त्यांना मिळाल्याने शाळेची उत्तरोक्ष प्रगती झाली. याकामी कै. रामराव गणपतराव देशमुख उर्फ दाआजी कै. बळीरामजी भगवंतराव देशमुख उर्फ तात्याजी आणि कै. आनंदरावजी चौबितकर यांचा मोलाचा वाटा आहे.
 

पुढे त्याच शाळेत इंग्रजी वर्ग चालू केले. अँग्लो इंडियन मिडलस्कूल म्हणून देशमुख तळेगांव दशासर यांनी शाळेला तशी मंजूरी दिली. याकामी कै. बाबुराव नामुजी पाटील चांदस-वाठोडा यांचे श्रेय आहे ते जिल्ह्या कौन्सिल अध्यक्षांचे मित्र होते. पहिले ऑग्ल शिक्षक क्र, नामदेव धर्माजी देशमुख (गांवाचेच) यांनी शाळेचे प्रगतीस पुत्रवत प्रेम केले. सन १९४८ मध्ये त्या शाळेचा सुवर्ण ज्युबिली महोत्सव झाला. क्र गोपाळराव नामूजी पाटील (वाठोडा) नागपूर निवासी, मार्गदर्शक, कै. विठ्ठलराव गणपतराव देशमुख सचिव आणि कै. गुलाबराव लक्ष्मणराव पाटणे शिक्षक हे सहसचिव होते. सदरर्हू कार्यक्रमास के. कर्मवीर भाऊसाहेब उर्फ पंजाबराव देशमुख भारताचे पहिले कृषीमंत्री प्रमुख पाहुणे होते. या कार्यक्रमात कै. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आलेच पाहिजे अशा जिद्दीने कै. विठ्ठलराव गणपतराव देशमुख यांनी आटोकाट प्रयत्न केले महाराजांचे सचिवांनी त्यांना नाही म्हणून धुडकावल्यावर थेट महाराजापर्यंत जातीने भेट घेऊन महाराजांची या समारंभास तारीख घेतलीच व लगेच नागपूरहून पत्रिका छापून घेऊन वाटेत गांवागावांत त्या वाटून ते गांवला आले. सर्वांना आश्‍चर्यासह आनंद वाटला. असा दृढ विश्‍वासू व पराकाष्ठेचा माणूस गावला भूषण वाटे.

1979-80.png

नव्या शाळेचा नव्या नावाने संसार चालू झाला

सावधान' पहेबिलाचे चारे

कै. रामरावदादा ग. देशमुख हे' दुरदर्शी धोरणी व हुशार होते. दष्रेपणाने' पद्ठेब्िळ येणार त्याआधी त्यांनी पद्ठेबिलात आपली जमीन जाऊ नये म्हणून सावधानता राखून जमिनीची (मर्यादेचे बाहेरील) मनाप्रमाणे बासलात लावली. “त्यात त्यांनी श्रीराम लिटरली इन्डस्ट्रीयळ अँन्ड अँग्रीकलचर सोसायटी'' काढून त्या संस्थेसाठी काही जमीन, काही जमिन श्री दुर्गादेवी संस्थानसाठी, काही जमिन श्रीराम मंदिर संस्थानसाठी विभागून पद्धतशीरपणे मार्ग सोपा केला आणि त्याच अनुषंगातून नूतन श्रीराम बाल विद्या मंदिर वर्ग ५ ते ८ आणि नुतन श्रीराम बाल विद्या मंदिर वर्ग १ ते ४ ची कल्पना उदयास आली.

वरीलप्रमाणे नामाभिधान घेऊन वर्ग ५ ते ८ व वर्ग ९ ते ४ च्या शाळेचा उद्‌घाटन सोहळा तत्कालिन खासदार श्रीमान पंढरीनाथ पाटील, चिखली बुलढाणा यांचे शुभ हस्ते झाला. संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष श्रीमान रामराव गणपतराव देशमुख वाठोडा हे बनले. शाळेचा संसार नदीकाठी असलेल्या श्री विठ्ठल मंदिर संस्थानचे आवारात (वाठोडा येथील) चालू झाला. ​ जुन्या बुनियादी माध्यमिक शाळा चांदस वाठोडा या चांदसचे इमारतीत १ ते ८ शिकवल्या जात होते. आता नव्याने वाठोडा येथे चालू झालेल्या वर्ग ५ ते ८ आणि वर्ग १ ते ४ वर्गापर्यंत शिक्षण चालू झाले. वर्ग ५ ते ८ चे मुख्याध्यापक डॉ. श्री. रामकृष्ण खुशालराव देशमुख, टेभुरखेडा हे पहिले मुख्याध्यापक होते आणि वर्ग १ ते ४ चे मुख्याध्यापक श्री.कै. शेषराव मालोजी साबळे भाऊसाहेब (जुन्या बु.मा. शाळा चांदस वाठोडा येऊन राजीनामा देऊन गेलेले) हे पहिले मुख्याध्यापक म्हणून होते.

वरुड-आमनेर सडकेचा शुभारंभ

नाकात दम आणणारा आमनेर-वरुडचा मार्ग जुना बोरांगजाऊन लोक सहभागातून ज्या पद्धतीने होईल त्या पद्धतीने शेतीचे दानपट्टे घेऊन तयार झाला. आपल्या गावच्या शेतकऱ्यांनी सुद्धा सडकेसाठी जमिनी दिल्या. आज त्याचे स्वरूप वरुड-नागपूर राजमार्गात झाले. तो राजमार्ग आपल्या दोनही गांबातून पुर्व-पश्‍चिम असा अस्तित्वात आहे. आमचे गावचे ब्लॉक डेव्हलपमेंट अध्यक्ष श्री. डॉ.डी.एंल. ठाकरे होते. त्यांचे कारकिर्दीत वाठोडा गावात या राजमार्गाचे दक्षिणेस नवी वस्ती निर्माण करण्यास “मास्टर प्लॅन' योजना त्यांनी राबविली. जिथे स्मशान उकिरडे भराटबन, तिथे ले आऊट देऊन नविन घरकुल देऊन लोकांचे नविन वस्ती स्थान झाले. त्याला कुणी रामनगर म्हणून संबोधतात कुणी प्लॉटवरचे घरे नवी वसाहत' म्हणून संबोधतात. याच भागात आता वाठोडा गावचे मोटार स्टँड (बस स्टँड) ग्राम पंचायत भवन, बाजार आदी शासकीय कार्यालये आहेत.

शासकीय अँलोपॅथिक दवाखान्याचे निर्माण

वाठोडा गावात अँलोपॅथिक दवाखाना निर्माण झाला याचे श्रेय वरुड ब्लॉक डेव्हलपरमेटचे अध्यक्ष डॉ. डी.एल. ठाकरे चांदस-वाठोडा यांचे होय. अवतीभवतीचे खेडे लक्षात घेऊन केंद्रस्थान म्हणून वाठोडा गावला हा दवाखाना उभा झाला. तात्पुरती इमारत वाठोडा ग्रामपंचायतच्या मालकीची दिली. त्यात पुरक शिशू संगोपन गृह, माता कल्याण कार्यक्रमाचे केंद्र निर्माण झाले. तिथे डॉयरेक्ट भंगी महिला कर्मचारी नियुक्‍त केले. तेथून गोरगरिबांना मोफत सेवा व उपचार याचा लाभ मिळतो. (आज तो दवाखाना आमनेरला जेव्हा ही दुर्दैवी बाब गांवचे नशिबी आली.)

इतर वास्तु निर्माण

चांदस परिसरात याच सडकेच्या दक्षिणेस ग्रामसेवक क्‍्वॉर्टर, ग्रामपंचायत कार्यालय, सेवा सहकारी संस्थेचे कार्यालय, गोडाऊन आणि अमरावती डिस्ट्रीक्ट को. ऑपरेटिव्ह बँक शाखा, गुरांचा दवाखाना बीज संकलनाचे उपकेंद्र आहे. सहकार क्षेत्रात श्री. भास्करराव उर्फ आप्पासाहेब देशमुख हे लागोपाठ दोनदा संचालक म्हणून निवडून येऊन त्यांनी तत्कालिन सहकार मंत्री यशवंतराव मोहिते यांचे हस्ते उद्घाटनाने गोडाऊनची वास्तू लोकार्पण केली. को-ऑप बँक शाखा श्री. जनार्दन भांजीभाऊ चोबितकर यांचे प्रयत्नाने उभी झाली. गावाच्या वैभवात भर घालून नवनव्या वास्तू उभ्या करून त्यांनी गावाला क्रणी करून ठेवलं. ​ त्याच कार्यकाळात वाठोडा येथे ग्राम पंचायतीने बांधलेल्या वास्तुत सेंट्रल बँक ऑफ इंडियाची चांदस-वाठोडा शाखा उघडण्यात आली. शेतकऱ्यांच्या सुविधेत या बँकेमुळे मोलाची भर पडली. पण गांवचे अनास्थेने ती वरुडला गेली जुन्यांनी कमावले नव्यांनी गमावले. ही बाब खेदाची वाटते.

सडका व वास्तु निर्माण

चांदस दाभी सडक, चांदस उदापूर सडक, चांदस राजुरा सडक, वाठोडा घोराड सडक, वाठोडा सावंगी सडक, मुसळखेड येथे श्री. यशवंत बाबा संस्थानला सभागृह बांधले. त्यांच्याच कार्यकाळात मुसळखेडची धुप नियंत्रण भित मंजूर झाली. ते काम लांबले. पण ते काम खासदार श्री. सुबोध मोहिते यांचे काळात पंचायत समिती वरुडचे उपसभापती आपले गावचे श्री. उमेश दवंडे यांचे सौजन्याने पार पडले. दोनही गावात सिर्मेट काँक्रिट रोड झालेत पैकी चांदसचे एका रस्त्यास मान्यवर, रामटेक भागाचे खासदार श्री. सुबोध मोहिते यांनी व बाकी रस्त्याचे काम माननीय श्री. हर्षवर्धन देशमुख (विदर्भ विकास महामंडळ अध्यक्ष असतांना) यांचे काळी झाले. शिवाय दोनही गावात समाज मंदिरे झालीत.

04.jpg

निसर्गाची लहर आणि पुराचा कहर

सन १ ९६०-६१ मध्ये महापूर आला. त्याने चांदस-वाठोड्याला फार नुकसान झाले नाही. पण १९९१ ला महापूर आला त्याने दोनही गावला जबर तडाखा बसला. दोनही गावची नदीकाठची घरे जवळची घेरे पुरामुळे खाली करावी लागली. घरे वाहून गेली. न भूतो न भविष्यती' असे नुकसान दोनही गावचे झाले. तत्कालिन खासदार कै. श्री. तेजसिंहराव भोसले नागपूर, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री के. श्री. वसंतराव नाईक, भारताचे तत्कालिन प्रधानमंत्री कै. नरसिंहराव, त्यावेळचे आमदार श्री. हर्षवर्धन देशमुख उर्फ भैय्यासाहेब देशमुख वरुड मोर्शी विभाग यांनी गावला तात्काळ भेटी देऊन दोनही गावच्या पुनर्वसनाचा प्रश्‍न जातीने सोडवला. दोनही गावला, गांवालगत पण सडकेच्या सान्निध्यात लोकांना घरे बांधून निवाऱ्याची सोय उपलब्ध करून दिली. आर.जी. देशमुख माध्यमिक शाळेच्या श्री विठ्ठल मंदिराजवळील खोल्या पुरात वाहून गेल्याने रोडवरच कै. बाबासाहेब देशमुख उर्फ श्री. वि.रा. देशमुख यांच्या मायरूख नावाचे शेतात संस्थेची इमारत बांधण्यास, त्याचप्रमाणे शाळेत कनिष्ठ महाविद्यालयाचे वर्ग सुरू करण्यास, तद्वतच शाळेला लागूनच धंदे शिक्षणाचे वर्ग एम.सी.व्ही.सी. जोडण्यास तत्कालिन आमदार श्री. हर्षवर्धन देशमुख (मोर्शी विभाग) यांनी जातीने शासन दरबारी शाळेचा प्रश्‍न नेटाने मांडून शाळेच्या अधिक प्रगतीचा मार्ग सोपा केला. दोनही गावचे पुनर्वसन वस्तीचा भाग नमुनेदार घर बांधणीतून करण्यात आला. एकंदरीत गावासाठी पुराचा शाप वरदानच ठरला.' असे एकंदरीत दोन्ही गावच्या बाबतीत घडले.

8.jpg

घ्येयार्थ धडपडणारी पोरं थोर होऊन गेली

कुणबाऊ थाटांतून सर्वसामान्य कुटुंबातील हे सर्वजण आहेत. उभय गावातून पहिले वहिले कै. श्री. एम.बी. देशमुख हेउपजिल्हाधिकारी (नागपूर) म्हणून निवृत्त झालेत. तसेच डॉ. श्री. एस.बी. घोटे हे किंदवाडा येथून मध्यप्रदेश सरकारचा आरोग्य सेवेत राज्य पुरस्काराचा बहुमान घेऊन निवृत्त झाले. तसेच कै. डॉ.व्ही.व्ही. घाटोळे ह्यांनी अमरावती जिल्हा परिषदेमध्ये आरोग्य सेवेचे प्राविण्य मिळवले. श्री. अण्णाजी बोकडे मुंबईस नामांकित आहेत. डॉ. उमेश बी. देशमुख  गावातच सेवारत आहेत. 

 १९६५ च्या भारत-पाक युद्धात भारतीय जवान श्री. विष्णुपंत के. पाटणकर (हवालदार) ह्यांना पाकी सैन्याने युद्ध कैदी म्हणून कोहाट येथे बंदिस्त करून ठेवले होते. तेथे त्यांनी देशासाठी अनेक हालअपेष्टांना तोंड दिले. सुदैवाने त्यांची तेथून मुक्तता झाली. आता ते सेवानिवृत्तीनंतर नागपुरला स्थायिक झाले. “साहसे: श्री प्रतिवसती'' आपल्या कला नैपुण्यावर ज्यांनी देशाबाहेर परदेशांत जाऊन मायभूमीचे नाव नोंदवले. अशा कर्तबगार तरुणात श्री. पुरुषोत्तम वाळकृष्ण चोबितकर यांनी अधिकृत झिंबावे तांजानिया येथे, श्री. एम.एस. धोटे यांनी आफ्रिकेत नायजेरीया येथे श्री, पी.एम, भुजाडे यांनी लंडन येथे (इलंड), चीनमध्ये वामहून डि. चांगोझा येथे आर.एम. बारस्कर यांनी, अमेरिकेत निरज ई. देशमुख, प्रशांत वा. पवार, डॉ. सौ. शितलनी संधी घेतली. या परदेशस्थ असणाऱ्या गावच्या तरुणांचा गावाला अभिमान वाटतो. *'दशदिशांत पसरो सुगंध या सुमनांचा !”' हीच गावची हार्दिक अपेक्षा !

संपादक गण : - 

डॉ. एस. बी. धोटे                मा. ब. सेवलकर
 ना. ना. देशमुख              भा. शि. कांबळे
वा. शा. देशमुख                सौ. प्रभा वा. देशमुख

*Our village: Adopted from book - Chandas Wathoda Krantidarshan

bottom of page