top of page

अस्वस्थतेचे एक वर्तुळ: मनाचा मौन दरवाजा

Updated: Dec 25, 2020

| अस्वस्थतेचे एक वर्तुळ | मनाचा मौन दरवाजा | . मारोती मानेमोड |

 

ख़ामोशीसे हज़ार ग़म सहना...

कितना दुश्वार है ग़ज़ल कहना..

(Credit: Vidyanand Hadke)


नुकतेच अखिल भारतीय मराठी गझल संमेलन वाशी- नवी मुंबई येथे प्रकाशित गझलकार प्रफुल्ल भुजाडे यांच्या मनाचा मौन दरवाजा गझलसंग्रह वाचतांना.. अनेक ठिकाणी पडद्यामागच्या शांततेची अस्वस्थता जाणवली..काळाचा ओघ आवरता येत नाही त्याला आवरण्याचा हट्ट मात्र विकृति जन्माला घातले म्हणुन खरेतर चिंतनाची संस्कृति ही मौनात आढळते ब-याचदा बोलूनही न कळण्यापेक्षा मौनाच्या भाषा जास्त आकर्षीत करतात..मनाचा मौन दरवाजा हा गझलसंग्रह या पैलुपैकीच एक ठरतो..जो सामाजिक प्रश्नाला सडेतोड उत्तर मागतो तो या गझलेने


खुशाल पाडा मंदिर मस्जिद चर्च अग्यारी जाळा सर्वांसाठी खुली करा पण माणुसकीची शाळा.!


मातीवरती पाय रोवुनी उभाच राहीन येथे भेटायाचे आहे तर तू खाली ये आभाळा..


वाहह... एक दुर्दम्य आशावाद वरील शेरातुन दिसून येतो. सन १९९९ साली गझलनवाज़ भीमराव दादांच्या गझल मैफिलीतुन गझल प्रेमाकडे वळलेले एक पाऊल आज गझलसंग्रह रूपाने दस्तुरखुद्द भीमराव दादांच्याच हस्ते गझल सागर प्रतिष्ठान कडून प्रकाशित झाला हा एक सुंदर योग...रसिकांसाठी ही सुंदर मेजवानी.. धार्मिकता व धर्म या अतिशय भिन्न गोष्टी आहेत..अगदीच दोन टोकं ती ..यासाठी की आज जी काही सामाजिक प्रश्नाची अपत्याची जननी ठरते त्या बाबी धर्म ,पंत, जात..इ त्याला कारण पारंपरिक संस्काराचा भाग..म्हणुन ख-या धार्मिकतेचे सत्यवचन ही पुढील गझलेतुन प्रफुल्लभाऊ मांडतात ..


प्राशिला विषाचा प्याला मी त्याला ईश्वर म्हटले जो सुर्य सकाळी आला मी त्याला ईश्वर म्हटले


चेतवून लाखो तारे आकाश उजळले ज्याने पण प्रकाशात ना आला मी त्याला ईश्वर म्हटले


गंगेत मारली नाही डुबकीही कधीच ज्याने पण घामामध्ये न्हाला मी त्याला ईश्वर म्हटले..


आज अनेक समाज माध्यम सर्वांसाठी खुली आहेत पण यावर न राहताही आपला कारवा चालू ठेवणारे अनेक कलावंत तळागाळात दिसून येतात... काळाच्या ओघात अनेक हात आपल्या स्वप्नांना लागत असतात काही कळत तर काही नकळत..म्हणुन सदैव ऋणात राहण्याची भावनाही एक सच्चा माणुस म्हणुन आपल्याकडे असायला हवी हे आज होत नसल्याची जाणिव ते या पद्धतीने मांडतात


तलवारीच्या घावावरती फुले टाचणे शिकलो बरेच होते बोलायाचे शांत राहणे शिकलो..!


तिचेच आता सरपण झाले घरात अडगळ झाली ज्या काठीला धरून आम्ही उभे राहणे शिकलो!


प्रेम,साकी,शराब हे तसेही साहित्याला वर्ज्य नसणारे विषय मग गझल कशी अपवाद राहील प्रफुल्ल भाऊ प्रेमाचा नाजुक धागा पकडतात व सखीपासुन दूर असण्याची अस्वस्थता पुढीर शेरात व्यक्त करतात..


काय बोलायचे काय सांगायचे शब्द माझ्यापुढे का रिते व्हायचे


आसवांनी जरी पत्र भिजवायचे कुशल आहे इथे हेच कळवायचे..


पुढे जबाबदारीच भानही व्यक्त होत ते असं


वाहून हे किनारे आले तुझ्या किनारी जाणून वादळा घे अपुली जबाबदारी..


हा केवढा भरवसा माझ्यावरी तिचा रे माझ्याच ती खुनाची देते मला सुपारी..


चोचीमध्येच त्यांच्या आकाश जन्मताना माझी गळून पडते पंखातली भरारी...


सौंदर्य ..शृंगार..नाजुकता ..तरल भाव दुख व्यथा आक्रोश..या अनेक पैलूंचे समन्वय साधत गझलकार आपला संसार थाटत असतो.. कधी प्रतिक त्याला हाका मारतात तर पधी संकेत ..चिन्ह यांना नवे आयाम गझलकार देतो..याला व्यापुन टाकणारी कला जन्मते तेंव्हा साहित्याच्या सामाजिक उपयोगितेचे भान उमजायला लागतं साहित्य लोकोत्तर होत जाते. एक हटके रदिफ चा शेर...


ती दिसली हसली तेंव्हा प्राणात मिसळले डोळे अन् फूल आडवे केले मुद्दाम झाकले डोळे..


तु गाठ सरकफाशाची मी साधाभोळा गुंता मी अडकुन पडलो असती तू सहज उकलले डोळे..


आशयाला कमी ओळीत व्यक्त करण हे एक कसबच असतं म्हणुन गझलच्या बाबतीत म्हणतात

घागर मे सागर ते काय खोट नाही..


खोल चिखलात हसरे कमळ ठेवले हात मळले तरी मन उजळ ठेवले.!


न्याय सत्यास हा मज मिळाला अता तू पुरावेच खोटे जवळ ठेवले.!


नागमोडी जरी काळ आला तरी हाय जगणेच माझे सरळ ठेवले.!


अनेक आशय घेउन लिहीणारे गझलकार मित्र प्रफुल्ल भुजाडे..सामाजिक आशयाची फारकत गझलेतुन घेत नाहीत..खरे तर साहित्याला हा विषय वर्ज्य करताच येत नाही अभिव्यक्तिचे आज अनेक माध्यमे उपलब्ध झाली आहेत पण माणुस म्हणुन माणसातला दुरावा कमी होतेय..प्रत्येक गझलकाराची एक लिखाणाची लकब असते एक वेगळी दृष्टि असते..


ऋतु तेच भारवले दाखवा मला श्रावणाचे झुले दाखवा..


म्हणाले कुणी जर फुले दाखवा तया हासणारी मुले दाखवा.!


मनाला करू मी कुठे मोकळे मला दार कोणी खुले दाखवा.!


प्रेमाचा एक वेगळा रंग ते मांडतात.. तो असा..


प्राणात चंद्र घेउन राधा घरी निघाली तो-यात चांदण्यांची कोजागिरी निघाली..


पदरात गुप्त काही लपवून ठेवलेले उघडून पाहिले तर ती बासरी निघाली..


साहित्य सवाल करते तेंव्हा सामाजिक प्रश्न पुढे येतात.विद्रोह व्यक्त व्हायला लागतो पारंपरिक दृष्टिकोण बदलण्याला एक विचार खरा कलावंत देत असतो अर्थात सामाजिक बंड करून पर्यायी व्यवस्था देण्यामुळेच आधुनिक क्रांती यशस्वी ठरल्या म्हणुन युरोपची क्रांती असेल सेव्हीयतची असेल वा बुद्धाची क्रांती असेल यांना प्रवाही केल ते साहित्यानं म्हणुन साहित्यिक, कलावंत हा एक बदलांचा महत्वपूर्ण दुवा राहिलेत ते याचसाठी.. एक थेट सवाल प्रफुल्ल भाऊंच्या शेरात असा येतो


रंध्रामधून जेंव्हा अंगास घाम येतो भेटावयास मजला अल्ला नि राम येतो..


पचणार काय त्यांना संवेदना बळीच्या उलटीमधून ज्यांच्या काजू बदाम येतो..!


जो पोसतो जगाला तो राहतो उपाशी ओळीमधेच एका किस्सा तमाम होतो.!


......एक वेगळ्या वृत्तातली गझल


कुणी हाल केले कुणी ठार केले कुणी वेदनेशी व्यभिचार केले.!


तुझ्या पायरीवर उभा राहिलो मी तुझ्या मंदिराला चिरेदार केले.!


ऋतुंनी फुलांच्या खुपसल्या कट्यारी मला मोसमांनी गुन्हेगार केले.!


आतल्या आत स्वतःचा होणारा एक प्रवाह ते असे अभिव्यक्त करतात..


याविना आयुष्य माझे मज न काही आठवे शब्द माझे स्मित मनोहर मौन माझी आसवे


जन्मल्यापासून माझ्या काळजाच्या आतली ही कुणाची नादयात्रा चालली माझ्यासवे..

 

टांगुनी न्यायास उलटे आणखी घायाळ केले विक्रमाने कायद्याला कागदी वेताळ केले


सांग माझ्या विठ्ठला तू काय मी वंगाळ केले वंचितांचे पाय दिसले हात मी गंगाळ केले.!


खळखळूनी सांडलो अन आणखी मी शुभ्र झालो पत्थरांनी मार्ग माझे जेवढे खडकाळ केले..असे अनेक प्रश्न.. अनेक पैलुमधुन प्रफुल्लभाऊ गझल लिहीत आहेत त्यांच्या आजवरच्या प्रवासतला एक टप्पा त्यांनी रसीकांच्या हाती सादर केला तो मनाचा मौन दरवाजा या रूपाने.मित्रांनो गझल प्रतिष्ठानच्या वतीने आदरणीय भीमराव दादांनी ४३ वर्षाच्या गझल चळवळीत जवळपास

पंधरा गझलेवरचे संग्रह प्रतिष्ठान कडून प्रकाशित केले आहेत अगदी गझलांचे छंदशास्त्र आनंदकुमार आडे पासुन ते.. शब्द झाले सप्तरंगी -दिलीप पांढरपट्टे , ऋतू वेदनेचा-संदिप माळवी ,मनस्पंदन -प्रमोद खराडे ,आंतरसल -अनंत नांदुरकर ,मराठी गझल-सुरेश भटांनंतर ,अंधाराचे दुख-डी.एन गांगण ,अमृताची पालखी-ऐ के.शेख , स्पर्शांकुर-भीमराव पांचाळे/राम पंडीत, ग़ज़लियत -गझल नवाज़ भीमराव पांचाळे , या अनेक संग्रहापर्यंत आज मराठी गझलेतील साहित्य संपदा गझल सागर प्रतिष्ठान मुळे निश्चितच संपन्न झालेली आहे..अर्थात इतरही अनेक संग्रहाने हे मराठी गझलेचे वैभव श्रीमंत होत आहे..मनाचा मौन दरवाजा त्यातलीच एक फांदी... शिखराकडेच धाव करणा-यांनी सदैव पायथ्याशी असलेली नाळ याच भान ठेवावं..हे भान आपल्याला श्रीमंत करतं.मला लाऔत्से ची एक भुमिका आवर्जून सांगावीशी वाटते तो म्हणतो की शिखर अस्तित्वात आहे पण त्याच्या असण्याला अर्थ आहे तो पायथ्यामुळे पायथा व शिखर एकच आहेत परस्पर पुरक भिन्न न होणारे म्हणुन साहित्यही समाजानिर्मित प्रतिबिंबाच अपत्य असते कलावंत मात्र निमित्त मात्र असतो यामुळेच लौकिक अर्थाने मोठ असण्यापेक्षाही माणुस होण महत्वाच हे भान जागृत करणा-या अनेक गझला आपणास मनाचा मौन दरवाजा यात वाचायला मिळतात..


(Credit: Vidyanand Hadke)


खूप खूप अभिनंदन प्रफुल्ल दा..पुढील वाटचालीस शुभेच्छा..! आदरणीय भीमराव दादापांचाळे यांचे मनापासून आभार दादा तुमच्यामुळे आज अनेक गझलकार जन्माला येत आहेत येत राहतील...

प्रफुल्ल भाऊंच्या काही शेरने मी समारोपकडे वळतो...


जरी कोरडा वरून दिसतो फुटतो पाझर दगडाला फोडून डोके हिंसा कर तू वा मुर्ती कर दगडाला.

 

अंबरी ना चंद्र येथे ना फुलांचे तीर होते आज माझ्या अंगणाला चांदणे दिलगीर होते..

चुंबले असशील माझे पत्रही मोठ्या खुशीने फाडले वाचून तेही केवढे तकदीर होते.!

कोणती मी वाट पकडू हाच होता प्रश्न मोठा या तिरावर तू उभी अन् त्या तिरी मंदिर होते.!

 

शब्द कोठे आतड्यावर वार करतो काळजाला टोचतो अन् ठार करतो..

शेवटी गोत्यात त्याचा शब्द येतो बोलतांना जो हुशारी फार करतो.!

गोफणीवर पाखरे बसताच माझ्या अंबरातुन तूच गोळीबार करतो.!

 

मेघात विहरतो तेंव्हा पाऊस असे एकाकी धरतीवर येता येता जो लाख कणांचा होतो.!

 

इथे ना कुणाचे खरे पीकपाणी चुका-याविना हे झुरे पीकपाणी.!

घबाडे वशीला लबाडी मुजोरी लफंगेच घेती बरे पीकपाणी.!

 

मला मारुन तू पत्थर सुखाचे सोहळे केले कुपीच्या आतले अत्तर जगाला मोकळे केले.!

कुण्या चांडाळ पक्षाने मनाची अंगणे नेली नभाला टांगली दारे सुखाचे कोचळे केले!

उभी राहू नको वेडे दुपारी अंग सुकवाया तुला पाहुन सुर्याने उन्हाला कोवळे केले.!

 

ओठात राम ज्यांच्या ह्रदयात राम नाही या नीच तोतयांचे दुनिये काम नाही..

डोक्यात ताप गेला मंदीर मस्जिदींचा पोटातल्या व्यथेचा कोणा जुकाम नाही!

 

भुगोल हिंदी गणित इंग्रजी आणि काव्यही नेले पण शाळेला मला न्यायला कसे विसरले दप्तर!

 

दीप पणत्या अन मशाली कोंडुनी कुलपात ठेवा काजव्यांचा सुर्य आला रात्र अंधारात ठेवा.!

कागदाचे पीक नाही कागदी नाही तृषाही कागदी पाणी नदीचे कागदी धरणात ठेवा.!

मी न भगवा मी न हिरवा मी निळा ना पांढराही फक्त मी माणूस मजला माझिया रंगात ठेवा.!

वाटतो जर धूळ आहे तर मला उधळून लावा जर सुगंधी फूल मी तर काळजाच्या आत ठेवा.!

 

कसे मी हाय सांभाळू झरोके धुंद स्वप्नांचे उघडता गंध जाईचा मिटवता जीव गुदमरतो.!

तुझ्या या हातची मेंदी उशाला चांदण्या होते मनाचा चंद्र ओठावर उभी ही रात्र जागवतो.!


संग्रह जरुर वाचा...धन्यवाद!


मारोती मानेमोड

 


गझलसंग्रह: मनाचा मौन दरवाजा

गझलकार: प्रफुल्ल भुजाडे, ९७६६५७४५५५

प्रकाशक: गझल सागर प्रतिष्ठान

स्वागत मूल्य: १२०/- रुपये फक्त
42 views0 comments

Comments


bottom of page