top of page

पोळा

Updated: Sep 6, 2021



पोळा असला म्हंजे महिनाभर अगोदरच गावाला त्याचे वेध लागून जातात. अवघ्या गावात झंडयामुंडया अन्‌ गंजिफ्याच्या जुगाराला उत येतो. नदीकाठच्या चिंचीखाली, मारोतीच्या किंवा महादेवाच्या पारावर, तर कुठं घरांच्या धाब्यावर, कोठयात, खंडा-यात जिथं सोईची जागा मिळेल तिथं पत्ते पिसणं सुरू राहते. गावातल्या शेंबडया पोरापासून तर तरण्या... म्हाताऱ्या पर्यंत शौकीन असलेले सारेच त्यात रमून जातात. पोळा म्हणजे आपल्या जगण्यात बैलांच्या कष्टाचं मोल जाणून कर्तव्यबुध्दीने फूल ना फुलांची पाकळी म्हणून त्यांच्या उपकाराची फेड करू पाहणा-या शेतकऱ्यांसाठी आनंदाचा दिवस. त्यांच्या कष्टाची जाणीव ठेवून या दोन दिवसात तरी शेतकरी आपल्या बैलांना कामाला जुंपत नाही. त्यांना चांगलं खाऊ पिऊ घालतात.


'पोळयाचा आदल्या दिवशी बैलांच्या खांद्याला कच्चं तूप व हळद लावून चांगली मालीश करतात. खांदमर्दन करून झाल्यावर पळसाच्या तिवनीचा देठ खांद्यावरून उतरून घेत ' कासरानं वयलं, तुत्यानं मारलं, आच्चं आवतन उद्या ज्येवाले येजा " म्हणत त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतात आणि बैलांची पूजा करतात. कामावरचे सालदार, कामदार त्या दिवशी मालधन्याकडे गोडधोड जेवतात. नवीन कपडे घालतात. सालदार, कामदारांना आणि मालधन्यांनाही तो आनंदाचा क्षणच...


त्या दिवशी त्यांना नदीच्या पाण्यात चांगलं घासूनपुसून धुतात. दुपारी बैल जोडया नदीवरून धुवून पुसून आणल्यानंतर शिंगाना रंग लावतात, बेगड लावतात. मस्तकावर कपाळसर, शिंगोटीवर मखर, गळयात पितळी साखळया, नाकात वेसन आणि गळयाला नवीन कासरा बांधतात. त्यांच्या अंगावर झूल पांघरून त्यांना चांगलं सजवतात.


बैलांना सजवून झाल्यावर त्यांची पूजा करतात. घरधनी त्यांना सांज्याचा गोड निवद खाऊ घालतो. मालधन्याच्या जोडीलाच कामक-यांची पंगत घरोघरी उठते. दुपारनंतर कलत्या दिवसाला बेलजोडया पोळयात तोरणाखाली जमा होतात आणि भूमकाची आरती येईपावतर हसत खिदळत झडत्या म्हटल्या जाते. पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या फार्मसीच्या शाळेजवळ नदीकाठच्या गोठाणावर पोळयाचं तोरण बांधलं जातं. तोरणात बैलजोडया सजून धजून येतात. बैलाच्या या सणाचं बैलजोडीच्या मालकांना मोठं अप्रूप वाटतं. बैलांना चांगलं सजवून धजवून सालदार आणि शेतकरी माणसं नवनवीन कपडे घालून बैलजोड्या तोरणात आणतात.


गावचा पोळा पाहण्यासाठी सान थोर मंडळी बुरुडाच्या वडाजवळ जमतात. काही टेकडयावरील मातामायच्या मंदिराजवळ पोळा पाहण्यासाठी गर्दी करतात. तर काही तोरण तोडण्याच्या पावित्र्यात आपआपली जागा घेऊन तोरणाखाली उभी राहतात. पलीकडच्या तीरावर चांदसच्या जोड्या उभ्या राहतात. पलिकडच्या गावातही पोळा पाहण्यासाठी लेकरा माणसांची गर्दी जमलेली असते.


पुरातन काळापासून चालत आलेल्या गावच्या रीतीरिवाजानुसार दाजीच्या वाडयातून भूमकाच्या आरतीत निवद गेऊन येणारा "रामचंद्रजी देशमुख" काका येण्याची सारेच वाट पाहत थांबून राहतात. पूर्वी चांदस या गावात दोन वेगवेगळे पोळे भरायचे. एक पोळा मातामायपासून दक्षिणेकडील भागाकडे कै. बापूजी भिकाजी देशमुख यांचा तर दुसरा त्यालाच लागून कै. बळवंतराव भगवंतराव देशमुख यांचा. त्यात त्यांचे त्यांचे कास्तकार अंतर्भू राहायचेत. वाठोडा गावातही हीच स्थिती होती. गावाच्या उत्तरेस कुमाजीबाच्या डोहाच्या पूर्व तिरावर कै. मारोतराव चोबीतकर यांच्या खटल्याला मानणा-या कास्तकारांचा एक पोळा तर दुसरा वाठोडा येथील विट्टल मंदिरासमोर नदीच्या पूर्व तिरावर कै. रामराव दाजी यांचे वतुळातील लोकांचा पोळा.


पोळयाचा सण बैल अन्‌ शेतक-यांसाठी जास्त महत्वाचा. तसाच अलीकडे तो दारू पिऊन गोंधळ घागलणा-यांसाठीही एक नामी संधीच झाला आहे. पोळा भरेपावतर ते भेटंन तितकी पिऊन घेतात अन्‌ गावभर इकडून तिकडे गोंधळ घालीत फिरत राहतात.


भरल्या पोळयात तोरण तुटताना तर त्यांच्या 'देशी' पणाला नुसता उत येतो. पोळा फुटताच बैलांच्या जोडया घरोघरी पुजेसाठी जातात. हे खाऊन पिऊन असणारे पोरंही बैलामागं जाऊन घरवाल्यांना जबरदस्तीनं 'पोही' मागतात. होळी शिमग्याला देशीचं जेवढं प्रस्थ होतं तेवढंच पोळयालाही, बाजारचौकातले, पानटपरीवाले, पोळयापूर्वीच दारूचा साठा करून ठेवतात. नेहमी न घेणारेही अशा मोसमात तिची चव चाखून पाहायचे.


जमलेली गर्दी झडत्या आता सुरू हुईन मंग सुरू हुईन म्हणत वाट पाहत उभी राहते. फार्मसीजवळच्या दगडी भिंतीवर पंजाबआबा आणि काही मंडळी तर इकडे बुरुडाच्या वडाजवळ सुधाकाका आणि काही

मंडळी गर्दी करुन उभी राहतात. एकमेकांना सवाल जवाब करीत खंड बोलत राहतात. त्यांच्या बोलण्यामुळे गर्दीत उत्साह संचरतो. सर्वांना आनंदाचं उधाण येतं. झोकात आलेली मंडळी खंडावर खंड बोलतात. कधीमधी त्याचं स्वरूप वैयक्तिकपणाकडेही झुकतं, मनाला लागेल असं बोलल्या जातं, ऐकणा-याला ते वाईट आणि बीभत्सही वाटू लागतं. पण ते सारं तिथल्या माहौलपुरतंच असतं. कोणीही ते वैयक्तिक घेत नाही.सवाल जवाबाच्या स्वरूपात झडत्या रंगात येऊ लागतात आणि त्या आनंदाच्या लाटेवर जमलेली मंडळी हिंदोळे घेत राहते.


इकडे वडाच्या मुळीवर चढून सुधाकाका झडतीची सुरूवात करायला जातो आणि प्रचंड गलका होतो. गर्दीत उत्साह संचारतो. आवाजाच्या दिशेने सारेच कान टवकारतात. कानात प्राण गोळा करून गर्दी ऐकू लागते.


"कापूस गेली,तूर गेली, संत्रा फुटला झाडावर

भाव पडला मालाचा, शासनानं सोडलं वा-यावर

सोन्यासारखा शेतकरी ढेकलावानी ईरला

कोणी न्हई वाली म्हून उभा व्यापाऱ्यानं चिरला

एक नमन गौरापारबती हर हर महादेव..."


पंजाबआबानं सुरूवात करून दिल्यावर शिट्टया, टाळया वाजवित गर्दी आनंद व्यक्‍त करते.

जवाबाची दुसरी झडती सुधाकाका म्हणतो...


" वाटी रे वाटी खोब-याची वाटी

म्हादेव रडत्ये दोन पैशासाठी

पारबतीच्या लुगडयाले छप्पन गाठी

देव कसा धावंन गरिबासाठी

एक नमन गौरापारबती हर हर महादेव..."


नतर पंजाबआबा खांद्यावरचा शेला सावरीत गर्जना करतो.


"ढवळया, पिवळया, लाल्या, धामन्या

तुमच्या भरोशावर आमची सारी शान

तुले लागलं पान तर माही व्हत्ये दाणादाण

मले रूतला काटा तं तुह्या झाला घाटा

एक नमन गौरापारबती हर हर महादेव..."


गर्दीचा उत्साह आणखी दुणावतो. शिट्टयांचे आवाज वाढतात. "आता दिवस बदललेत, काळ बदलला तसतशी झडत्यातील अश्लीलता कमी करून आधुनिकता आणण्याचं श्रेय ह्या झडक-यांनाच जातं.." अशी चर्चा वडाजवळ जमलेल्या मंडळीत चालू असते. पंजाबआबाच्या झडतीचा धागा धरुन सुधाकाकानं झडती म्हणतो.


"काळया वावरात कुंद्याच्या खटी

बैल बांधले गोठयात दाटोदाटी

शामराव म्हने बुडली शेती

गुण्याजी म्हने लाव छातीले माती

एक नमन गौरापारबती हर हर महादेव..."


आनंदानं ओथंबलेल्या गर्दीत उत्साह ओसंडून वाहत राहतो. रामचंद्रजी देशमुख काका भूमकाची आरती घेऊन तोरणात येतो आणि एकच गलका होतो. त्या आवाजानं तोरणातले बैल बुजाडतात. गर्दीही हेलकावते. तशीही पिऊन चढीवर असलेल्या दारूच्या झोकानं गर्दी नाही म्हटलं तरी थोडी हेलकावतच राहते. हा रामचंद्रजी देशमुख काका म्हणजे एक वल्लीच, नकला छान करायचा. नकलाकार म्हणून पंचकोशीत नावाजलेला. पोळयाच्या दिवशी आपलं असं एखादं सोंग घेऊन तोरणात यायचा आणि गावक-यांना आनंद व्हायचा.


झडत्यांच्या तालावर गर्दी हेलकावत राहते. रामचंद्रजी देशमुख काका आरती घेऊन बैलाजवळ जातो. त्यांना धूप नि निवद दाखवून तोरणातल्या जोडींना पिठोळा चाटवतो. धूप दाखवून पिठोळा बैलांना चाटवला, की झोकांडया घेणा-या मंडळीबरोबर तोरणाचा वेळू झोकांडया खावू लागतो आणि दुस-याक्षणीच तोरण तुटतंतेव्हा झडत्यांना विराम देत पंजाबआबा निरोपाची झडती म्हणतो.


"झडती रे झडती

'पोयाची झडती

ह्या झडतीले शेंडा ना बुड

पोट्टे लेकाचे हूड भई हूड

एक नमन गौरापारबती हर हर महादेव..."


तोरणातून बैलजोडया बाहेर जाऊ लागतात. गर्दी पांगू लागते आणि बैलजोड्या आपआपल्या घरी जातात. वडाजवळचा गोळका पोळयाच्या झडत्यांची आपआपसात चर्चा करीत घराच्या वाटेने लागतो.


घरी जेवण झाल्यावर बव्हंशी वेळेचा अदमास घेऊन मंडळी ठरवल्यानुसार तुंग्यातुंग्यानं जमा होऊन आपल्या सोयीच्या ठिकाणी पसार होतात. त्या रात्री कोण कुठे गेला असेल किंवा कोण कुठे मिळेल हेही नक्की सांगता येत नाही. जो तो आपापल्या सोयीत असतो. बैल पोळयाच्या आणि तान्हया पोळयाच्या रात्री ही मंडळी रात्रभर पत्ते कुटत असतात. रात्रभर पत्ते कुटून कुटून आरोळया जांभया द्यायला लागतात. पण पत्त्यांचा हा जोग त्यांना धड झोपूही देत नाही. झोपले तरी त्यांच्या डोळयात पत्तेच गरगरत असावेत. पत्ते कुटता कुटता पहाट व्हायला येते. कळंचा म्हणजे तान्हया पोळयाचा दिवस उगवतो. घरातून म्हातारी कोतारी तशीच पोरंसोरं " ईडा पिडा घेऊन जाय मारबत.....,रोगराई घेऊन जाय मारबत....." म्हणत घरातील झाकण्या, घमेले वाजवून मारबत नदीवर हाकलत नेते. रात्रभर पत्ते पिसून तारवटलेल्या डोळयांनी आपले पत्ते पाहत असलेला एखादा म्हणतो.

" झालं असंन आत्तं बंद करा लेकहो, एवढा डाव झाल्यावर उठा, घरी जा लागंन ना मारबत हाकलाले..."

हातातील पत्ते पाहून खाली टाकत सोबती म्हणतो.

"थांब न बे थोडक्सा"

"कावून झोंबलं काय तुले शेवटी शेवटी "

हातून डाव निसटल्यावर जागचा उठत सोबती म्हणतो.

"शेवटी मले खा साठीच आल्ते भोसडीचे हे दलिंदर पत्ते ऐन उठाच्या वकती, जवू दे चाल आत्तं. "

दोघेही उठून घराकडे किती आले किती गेले यावर बोलत चालत निघतात.


मारबतचा आवाज आता घराबाहेर पडू लागलेला असतो. काल दिवसभर दाट्ट्यांशी झुलणारे पळसाचे मेढे एका जागी गोळा करून, "ईडा पिडा घेऊन जाय वो मारबत.... रोगराई घेऊन जाय वो मारबत...., ईच्चू काटा घेऊन जाय वो मारबत.., किडूक माडूक घेऊन जाय वो मारबत..." म्हणत घरातला कोणीतरी मारबत हाकलत नदीकडे चालू लागलेला असतो. मेढयांचे शिरवलेले पानं नदीच्या पाण्यावर तरंगत असतात. मारबत नदीत शिरवून नदीतली रेती टोपलीत भरून आणतात. अंगणात आल्यावर त्यातील थोडी रेती घरभर फेकली जाते.


मारबत शिरवून आणलेली रेती घरात आणि घरांच्या कौलारांवर फेकली म्हणजे ईचू काटा येत नाही, काही धोका होत नाही असा समज रुढ झालेला आहे. आणि अशीच चालत आलेली पूर्वापार श्रध्दा, समजूत आहे. पळसाच्या काडया दिवाळीच्या आंघोळीचं जळण म्हणून घराच्या छपरावर ऊन खात पडलेल्या असतात.


बैलांच्या मानाचा पोळा हा सण या सा-याच मंडळीसाठी एक अनोखा उत्सवच असतो.


 

- प्रमोद बाबुराव चोबीतकर

 

Pola | Chandas Wathoda | Festival | Bail | Nandi | Marbad | Ghat | Bel Nadi | Niwad | Juaa | Pramod Chobitkar | Toran | Patte | Tanha Pola |

144 views0 comments
bottom of page