top of page

#बाप

सुमित (माझं घरातील नाव), असशील तसा निघून ये , पप्पांची तब्येत जरा जास्त बिघडलीय , तू आलास तर तेवढंच बर वाटेल त्यांना , आणि तुझी ही भेट होईल....., कदाचित ....... शेवटची.

Suraj दादा (मावस भाऊ) चे हे शब्द ऐकून काळजात धस्स झालं. ८ व्या मजल्यावर घराच्या बाल्कनीत उभा होतो पण जणू पायाखाली जमीन नव्हतीच. एकीकडे बाप आणि दुसरीकडे असंख्य न सुटणाऱ्या प्रश्नांचं वादळ , माझ्यापासून गाव ८०० कीलो मीटर , त्यात सरकार उद्यापासून लॉकडाऊन जाहीर करणार , काय सुरू राहील काय बंद राहील काही एक अंदाज नाही .

जरा वेळ विचार केला आणि घेतला तो निर्णय की , जन्मदाता आधी ..., बाकी जे होईल ते बघू . अर्जंट तिकीट बुक केलं आणि निघालो ते अनिश्चित प्रवासाला , घरी जाऊन काय होणार माहिती नाही . जेव्हापासून पप्पांची तब्येत खराब झाली तेव्हापासून फक्त फोन वर बोलण सुरू होत , गेल्या दोन दिवसांपासून फक्त दुसऱ्याकडून च खबरबात समजली . एवढ्या दिवस सुरज दादा होता त्यांच्या सोबत तो असताना मी निश्चिंत होतो पण दुपारच्या त्याच्या त्या शब्दांनी मनात घालमेल मात्र होतच राहीली. एव्हढ्या दिवस त्यानेच धीर दिला आणि आज त्याला एवढं हतबल बघून माझं मलाच काही कळेना झालं.


तो रात्र भराचा प्रवास जणू एक तप उलटून गेल्या गत जाणवायला लागला . कसाबसा अमरावती पोचलो , अमरावती पासून अजून १०० कीमी प्रवास , तो कसा करायचा कारण बसेस बंद . घरी तर जायचं . परिचयातील एक बाईक घेवून निघालो . वरूड वरून सुरज दादा पण सोबत आला . घरी पोचलो , याआधी पप्पा ना मी या अवस्थेत कधीच बघितल नव्हत , डोळ्यातून पाणी बाहेर पडू दिलं नाही कारण माझ्या च डोळ्यात पाणी आल तर बाकी घरी धीर कोण देणार. त्यादिवशी तो दिवस आणि ती रात्र गेली .

दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्या बरोबर आधी त्यांचं ऑक्सिजन लेव्हल चेक केलं , ते ऑक्सीमीटर चे आकडे जणू धक्का देणारे होते , त्यांना नं सांगता लगेच पहिला फोन सुरज दादा ला केला आणि बोललो , दादा .., कुठल्याही परिस्थितीत आज एडमिट करावं लागणार , ऑक्सिजन लेव्हल ८४-८५ आलाय .

घाबरु नको मी करतो काहीतरी , एवढं बोलून फोन कट झाला. १० मिनिटात परत फोन आला , आपण ऑक्सिजन सिलेंडर घरी घेवुन जाऊ बाकी तोपर्यंत आपल्याला वेळ मिळतो हॉस्पिटल आणि बेड मिळते का ते शोधायला. स्वतःचा बापासाठी जे करतो ते सुरज दादा ने केलंय . घरी येवून ऑक्सिजन सिलेंडर लावल. थोडा तात्पुरत समाधान वाटल पण हे समाधान जास्त काळ टिकणार नव्हत . अमरावती , चांदुर बाजार , परतवाडा सर्व ठिकाणी सर्व हॉस्पिटल ना फोन लावून झाले , पण बेड विथ ऑक्सिजन कुठेच मिळत नव्हत .

दुपारी ३ च्या दरम्यान एक फोन आला , दादा..., सुपर स्पेशालिटी मध्ये बेड आहे , तुम्ही पेशंट घेवून या. क्षणाचा विलंब न करता अंबुलन्स दारात आली , पप्पा आणि मी आम्ही दोघेच निघालो . मनात अन् -गिनत विचार वादळांचा काहुर माजलाय ..., सुपर स्पेशालिटी ला पोचलो , त्यांनी पेशंट ऍडमिट करण्यास नकार दिला , कारण आमचा पेशंट कोविड नेगटिव होता. त्यावेळी एका सेकंदा साठी कोविड पोझिटिव का नाही असं वाटल . आणि परत तीच शोधाशोध सुरू झाली , हॉस्पिटल... ऑक्सिजन आणि बेड.

जेव्हा तुम्ही ऑक्सिजन आणि बेड शोधत असता त्यावेळी तुमचा रुतबा, ओळख, माज सर्व कुन्या एका कोपऱ्यात जमा असते , कारण तिथे कुठलीच ओळखी कामाला येत नाही .

शेवटी , एवढी शोधाशोध करून रात्री ९-९:३० च्या सुमारास "अनंत हॉस्पिटल - कल्याण नगर" मधून फोन आला , दादा बेड आहे घेवून या पप्पांना . फोन करणारा व्यक्ती माझ्यासाठी जणू देवदूतच . लगेच १० मिनिटात अंबुलान्स ने हॉस्पिटल गाठल आणि आधी पेशंट ला ICU मध्ये ऍडमिट करून , फॉर्मलिटीज करायला खाली आलो. तेव्हा कुठे थोडा जीवात जीव आला , आणि एवढ्या वेळ साठवून ठेवलेला तो डोळ्यातील थेंब खाली पडलाच , मी पण अश्रू वाहू दिले कारण तेव्हा मला बघणारा मी एकटाच होतो आणि सभोवतली माझ्यासारखेच असंख्य चेहरे , कुणाची न कुणाची वाट पाहत डोळे पाणावलेले.

ICU मध्ये जास्त वेळ थांबायची मुभा नव्हती , जेवण तेवढं द्यायचं आणि बाहेर थांबायचं . सांगितल ते औषध आणून द्यायचं. दोन दिवसानंतर ICU मधून स्पेशल रूम मध्ये शिफ्ट झालो , तब्येत बऱ्यापैकी स्थिरावली होती .व्यवस्थित बोलायला लागले , जेवायला लागले .

बोलता बोलता त्यांनी स्वतःच विषय काढला , की तु पुण्यावरून कधी आला हे मला माहीतच नाही , त्यादिवशी जर तु नसता आलास तर आज आपण बोलत नसतो , आज तुझ्यामुळे मी जिवंत आहे . आपल्या जन्मदात्या बापाकडून हे शब्द ऐकून कुणीही धन्य पावेल , त्याबाबतीत , माझ्यासारखा भाग्यवान मीच असा उगाच खोटा अभिमान मिरवत फिरलो .

दिवसांनंतर दिवस उजाडले - मावळले . पप्पांच्या तब्येती मध्ये पण सुधार आला , तेवढाच धीर मनाला येत होता . त्यात , Shubham Mahalle. Shubham Raut Patil, Shivaji Watane Patil, Ajinkya Dange, Shubham Jadhav हे सोबत असताना मला चिंता करायचं कारण नव्हतच.

" काळ आला , पण वेळ आली नव्हती " . आज आई जगदंबेच्या कृपेने यशवंत कृपे सर्व सुखरूप आहे. ते म्हणतात ना " जावे त्यांच्या वंशां , तेव्हा कळे || " तसच काहीस झालंय .


यादरम्यान, फोन, मेसेज करून Mukesh Likhitkar, Prajakta Gawande, Likhitkar, Anil Gawande, Ashwin Gawande, Yuvraj Deshmukh... प्रत्येकाचं नाव घेणं शक्य नाही तरी ज्यांनी विचारपूस केली , धीर दिला तुम्हा सर्वाचे आभार . तुमच्यामुळे ती हिम्मत मी माझ्यात कायम ठेवू शकलो .


काळजी घ्या | घरात रहा |

तुम्ही स्वतःच तुमचा जीव वाचवू शकता आणि सध्या तरी तेच महत्त्वाचं आहे...

 

ऋषिकेश गावंडे

(https://www.facebook.com/gawande.rushikesh) अमरावती - १ मे २०२१

 

father | Sumit | Rushikesh | Gawande | Hospital | Doctor

61 views0 comments

Kommentare


bottom of page