भणंग
Updated: May 23, 2021
| भणंग - प्रमोद बाबुराव चोबीतकर |

प्रमोद बाबुराव चोबीतकर यांची भणंग कादंबरी विदर्भातील ग्रामीण जीवनाचे, तिथल्या माणसांचे, ग्रामीण संस्कृतीचे अस्सल दर्शन घडवते. विदर्भातील लहानशा गावात आपल्या नशिबी आलेले जीवन जिद्दीने जगणारी द्वारका कादंबरीच्या पहिल्या भागाच्या केंद्रस्थानी असली तरी तिचा सासरा केरबा आणि मुलगा शिर्पा यांच्यासह गावातली माणसे, गुरेढोरे, शेतजमिनी, कृषिजीवनाला व्यापून असणारे ऋतुचक्र, अज्ञान, दारिद्यर, कष्ट, श्रद्धा, समजुती या सार्यांचे तपशिलवार, शेकडो बारकाव्यांनिशी चित्रण करताना लेखकाचे वर्ण्य विषयाशी असलेले तादात्म्य, ग्रामीण जीवनपद्धतीचे त्याचे सुक्ष्म निरीक्षण तर ध्यानात येतेच, पण त्याचबरोबर समाजजीवन, त्याला व्यापून असणारे राजकीय जीवन, त्यातले ताणतणाव वांचेही जिवंत भान लेखकाने सतत ठेवले असल्याचे जाणवते. ग्रामीण विदर्भातली संस्कृती, तसेच वैदर्भी भाषा, त्यातल्या म्हणी, वाक्प्रचार, शब्दांचे पोत हे सारे या कादंबरीच्या कानात रक्तप्रवाहासारखे वाहत आहे असे जाणवत राहते. या कादंबरीतली वर्हाडी भाषा सहज, अकृत्रिम आणि कमालीची अर्थवाही आहे.
- वसंत आबाजी डहाके
मराठीचे लेखक आणि कवी ,भाषातज्ज्ञ
वाठोडा येथील प्रमोद बा चोबीतकर यांच्या भणंग कादंबरीचे प्रकाशन बुधवार ५ जून २०१९ थाटात झालं. खऱ्या अर्थाने ग्रामीण जीवन पद्धती अनुभवलेला अनोख्या सृजनशीलतेचा मानकरी प्रमोद चोबीतकर. गझल,कविता, खंडकाव्य या क्षेत्रात आपल्या लेखणीचा ठसा अगदी बोलकेपणाने उमटवला.तीच मानवी कणव उरात बाळगून साहित्याच्या नव्या प्रांतात अगदी यशस्वी पणे भणंग च्या निमित्याने प्रवेश नोंदवला आहे ही आम्हा सर्वाणसाठी अगदी अभिमानाची बाब आहे.


वऱ्हाडी बोली असो मराठीचा वैदर्भी बाज असो प्रमोद चोबीतकर यांनी अलगद पान्हावलेल्या मायबोलीचा अचूक आणि सूचक वेध घेतला आहे. भावनांना भाषा प्रमाण नाही पण भूमिका अभिव्यक्त करताना भाषेला होणाऱ्या प्रसव वेदना लिहिणार्यालाच चांगल्या कळतात. भावना शब्द आला की विचारही मातीतून यावे लागतात.
मातीशी नाळ जुळलेला माणूस म्हणून प्रमोद ची खरी ख्याती आहे. भणंग बरेच काही सांगून जाते साठलेल्या भावनांचा होणार हळुवार विसर्ग हाच भणंग कादंबरीच्या रेखाटणातला आत्मा आहे. भणंग लिहिताना द्वारका केरबा शिर्पा या भूमिका नकळत वाचकांच्या मनात उतरतात हे काळतही नाही यालाच प्रतिभेची उंची असे म्हणता येईल.
प्रमोद चोबीतकर अशाच प्रतिभेच्या उंचीचा माणूस आहे. अस लिखाण करताना माणसं केवळ पाहता येणे आवश्यक नाही तर ती वाचता आणि अनुभवता आली पाहिजेत इतके मात्र नक्कीच
भणंग च्या निमित्ताने आपण सर्वच ओळखत असलेल्या प्रमोद ची आणखी प्रेरणादायी ओळख तयार झाली आहे. भणंग ही केवळ कादंबरीच नवे तर ती एक तपसचर्या आहेसामाजिक जाणिवेचा निखळ पाझर आणि सृजनशीलतेचे प्रतीक आहे.
-अमरादीप गो. खाडे
https://www.facebook.com/amardip.khade
कादंबरी: भणंग
लेखक: प्रमोद बाबुराव चोबीतकर (https://www.facebook.com/pramod.chobitkar.5)
प्रकाशक: लोकवाङमय गृह
स्वागत मूल्य: 310/- रुपये फक्त
https://www.akshardhara.com/en/kadambari-sankirn/32008-Bhanang-Pramod-Chobitkar-Lokvadmay-Grih-buy-marathi-books-online-at-akshardhara-9789382906421.html