top of page

रसग्रहण: गझलसंग्रह_मनाचा मौन दरवाजा

रसग्रहण: डॉ.राज रणधीर | 21 March 2019

 

गझल ही विषयवैचित्र्याची माळ असते असे म्हणतात म्हणून गझलकारांना वेगवेगळ्या विषयावरील शेर गझलेत माळण्याचा हव्यास असतो.उत्स्फूर्तपणे असे घडले तर हरकत नाही. पण प्रयासाने असे केल्यास कोणी गझलेवर कृत्रीमतेचा प्रतिवाद करणही कठीण असत.बऱ्याच गझलकारांच्या गझल अशा हव्यासापासूम मुक्त आहेत त्यातलेच एक नाव म्हणून गझलकार प्रफुल्लजी भुजाडे यांचे घेता येइल.


जेव्हा त्यांचा मनाचा मौन दरवाजा माझ्या हातात आला तेव्हा पहिल्या गझल पासून शेवटच्या पानापर्यंतचा प्रवास हा अवर्णनीय आणि अविस्मरणीय होता. या गझलसंग्रहात एक से बढकर एक अशा हृदयस्पर्शी गझल आहेत. जाणिवेपासून शब्दापर्यंतचा प्रवास म्हणजे शायरी अर्थात शायरी म्हणजेच स्वतःपासून स्वतःपर्यंतचा प्रवास परंतु हाच प्रवास पार करतांना कधीकधी आयुष्य कमी पडत.?


भीमराव पांचाळे दादांच्या स्वरांच्या जादूने मोहीत झालेले प्रफुल्लजीं यांचा हा गझलप्रवास हृदयाला स्पर्श करून जातो. या गझलसंग्रहात १०३ एकापेक्षा एक सरस अशा गझल आहेत. वाचतांना कुठेही कंटाळवाणे वाटणार नाही इतकी सुंदरता प्रत्येक गझलेच्या प्रत्येक शेरामध्ये आहे. गझलेचे विविध अंग हीच खऱ्या गझलकाराची खासियत असते. आपल्या दैनंदिन जीवनातील अनुभवच अगदी सफाईदार पणे शेरात मांडणे हेच त्यांच्या यशस्वीततेचे गमक आहे.रातीला जे दीप विझवले माझे होते कितीक अश्रू आत लपवले माझे होते..


साखर झोपेमध्येच अलगत एकाएकी ज्या स्वप्नाने तुला उठवले माझे होते...


त्यांचे वैशिष्ट्य असे की रसिकांना प्रत्येक शेर हा स्वतःची व्यथाच वाटते. अशी त्यांची पहिलीच गझल मनाला स्पर्श करून जाते.पुढे शेतकऱ्यांची व्यथा मांडतांना ते म्हणतात..


भरवून जगाला साऱ्या दो घास गिळायासाठी हातावर ज्याच्या छाळा मी त्याला ईश्वर म्हटले


गंगेत मारली नाही डुबकीही कधीच ज्याने पण घामामध्ये न्हाला मी त्याला ईश्वर म्हटले..

आपल्याच अंधश्रद्धेमध्ये गुरफटलेल्या समाजव्यवस्थेवर हा अलवार वार त्यांनी केलेला आहे.गझल मधून विद्रोह दाखवणे आणि ते ही इतक्या सहजपणे ही त्यांना लाभलेली नैसर्गिक देन आहे .. राजकारणावर उपहासात्मक टीका करतांना ते म्हणतात..


दुकानदारी चालवायला तुमच्यासाठी बरेच आहे झोपी गेल्या या जनतेला तुम्ही तरी उठवाल कशाला

(हृदय कधीचे काळे झाले रक्त ठेवले लाल कशाला)


मृत्यूच्या शय्येवर निजणाऱ्यांसाठी प्रफुल्लजींची गझल अमृत ठरते, नवसंजीवनी ठरते. असेच मला वाटते त्याचे कारण हे दोन अजरामर शेर तर बघा...


त्यांच्याच झोपड्यांना का लागतात आगी ज्यांना कधी चुलीला सुलगावता ना आले


पक्षी उडून गेले दाही दिशास सारे मी एक झाड होतो मज हालता ना आले


तंत्रशरणता किंवा यमकानुसारित्व हे गझलसंग्रहात कुठेही दिसत नाही. उलट खयाला मधील सच्चेपणा त्यांच्या लिखाणात जास्त दिसून येतो.. म्हणतात ना .. चिंगारी क्या बया करे तुफान का अंदाज क्या होता है, तसेच प्रफुल्लजी एक गझलेमधले वादळ आहे असेच जाणवते.. इतक्या चांगल्या गझल वाचून मज रसग्रहण केल्यावाचून राहावले नाही. हटके मिजाज है या शायरचे..


जरा वाढता कांदा येथे रडणाऱ्यांनो थोडे शेतकऱ्यांच्या हत्तेसाठी दोन आसवे ढाळा


त्यांच्या वेतन आयोगाला त्वरित मिळे मंजुरी अमुच्या आणेवारीसाठी पुन्हापुन्हा पडताळा

 

सामाजिक व्यवस्थेवर हा विद्रोह वाखाणण्याजोगा आहे. रसग्रहाणासाठी संकलन करतांना कुठल्या गझलचा कुठला शेर घ्यावा हा संभ्रम क्वचित गझलसंग्रहातच पाहायला मिळतो त्यामधून प्रफुल्लजींचे नाव आघाडीवर असावे असे मला वाटते.


 

एकटाच मी कसा सुपात राहिलो जीवनास या पुन्हा निसायला हवे


वाजते व्रणातुनी मधूर बासरी घावही तुझेच हे असायला हवे

एकदम भन्नाट शेर आहेत हे, मुकर्रर ..


घेतले बोलावुनी तू चार चौघातून मजला हाय नजरेचे इशारे केवढे शातीर होते


कोणती मी वाट पकडू हाच मोठा प्रश्न होता या तिरावर तू उभी अन् त्या तिरीं मंदिर होते


कस्स म्हणजे कस्स सुचतो हो इतके छान लिहायला ...


रंध्रामधून जेव्हा अंगास घाम येतो भेटावयास मजला अल्ला नि राम येतो


पचणार काय त्यांना संवेदना बळीच्या उलटीमधून ज्यांच्या काजूबदाम येतो

एकदम परखड... मानवी मनाची आंदोलने टिपणारी, कधी शब्दातून तर कधी मौनातून कागदावर उतरणारी ही गझल नक्कीच आश्वस्त असते..


मला मारून पत्थर तू सुखाचे सोहळे केले कुपीच्या आतले अत्तर जगाला मोकळे केले

सुरेश भट हे मराठी गझलचे खलिफा आहेत.त्यांचा प्रभाव असण स्वाभाविक आहे पण प्रत्येक शायराने त्यातून बाहेर पडणे हेच उत्तम आणि प्रफुल्लजींना ते बखुबी जमले आहे असेच वाटते. आपले स्वतंत्र अस्तित्व त्यांनी निर्माण केले आहे..


वृत्तपत्रांचीच चाले रासलीला बाटलीचा वास येतो बातमीला


नाईलाजानेच आता रुग्ण मरतो संपतो पैसा श्रमाचा चाचणीला


जियो सरजी... क्या कलम पायी है आपने....


नाहीत दवाचे बिंदू या हिरव्या पानोपानी हे तुला पहाण्यासाठी पात्यात उगवले डोळे


प्रफुल्लजींचा हा गझलसंग्रह फक्त गझल रसिकांना आनंदच देणार नाही तर तो त्यांच्या मनात अगदी कायमस्वरूपी हक्काचे एक घर बांधून कायमस्वरूपी दरवळत राहील असेच वाटते... आपणास पुढील वाटचालीसाठी मनस्वी शुभेच्छा देतो आणि माझे लांबलेले रसग्रहण थांबवतो..

धन्यवाद!


रसग्रहण

डॉ.राज रणधीर, ९९२२६१४४७१

 

गझलसंग्रह: मनाचा मौन दरवाजा

गझलकार: प्रफुल्ल भुजाडे, ९७६६५७४५५५

प्रकाशक: गझल सागर प्रतिष्ठान

स्वागत मूल्य: १२०/- रुपये फक्त


23 views0 comments

Comments


bottom of page