डॉ. निरंजनमाधव अंजनकर
अक्षसैदर्भी । एप्रिल/मे/जून-२०२०. |
जनसारस्वत स्मृति सन्मान २०२० करिता कादंबरी या वाडूमय प्रकारात पुरस्कृत "भणंग"
(प्रमोद चोबितकर, अमरावती) या कादंबर्याचे जननिष्ठ दृष्टीतून मूल्यदर्शन.
“भणंग”
प्राचीन काळापासून देशोदेशीच्या साहित्यप्रांतात कादंबरीसदृश लेखन होत असल्याचा इतिहास आहे. मानवी जीवनाचा अत्यंत गांभीर्याने आणि जीवननिष्ठ कलात्मकतेने शोध घेण्याच्या प्रेरणेतून प्रतिभावंतांनी विस्तृत, व्यमिश्र, व्यापक असा जीवनाशय कादंबरीद्रारा आपल्या लेखणीतून आविष्कृत करण्याचा प्रयत्न केलेला दिसून येतो. महाराष्ट्रात यमुना पर्यटन' (१८५७) ह्या बाबा पदमनजी यांच्या आद्य कादंबरीपासून तो आजतागायत हा कादंबरी प्रवाह अक्षुण्ण वाहताना दिसतो. कादंबरी हा बहुआयामी, समाजवास्तवनिष्ठ व विविध वाड्मयप्रकारांतील सत्त्वयुक्तता पचवून संपन्न झालेला वाड्मयप्रकार आहे.
'भणंग' ही प्रमोद चोबीतकर यांची पहिलीच कादंबरी आहे. वैदर्भीय जनसंस्कृतीतून फुललेल्या या कादंबरीचा निर्मिती-अस्तित्व-आस्वाद या त्रिविध पातळ्यांवरून विचार करता असे लक्षात येते की जगाकडे पाहाण्याची लेखकाची दृष्टी ही गांभीर्यपूर्ण आणि विलक्षण चिंतनशील तद्वतच ज्ञानात्मक-विचारशील व वास्तवलक्ष्यी आहे. जीवनानुभबातील वास्तवालानानी आपल्या अनन्यसाधारण महत्त्व 'भणंग' मध्ये लाभलेले आपल्या सकृत्दर्शनीच लक्षात येते.
पारंपरिक शोषण व्यवस्थेला झिडकारून आत्मशोधक वृत्तीने स्वतःचे भविष्य घडवायला संघर्षयाथा आहे. निर्मात्याची विलक्षण आशावादी जीवननिष्ठा इथे हव अनेक अगम्य-अनाकेलनीय घटितांशी प्रत्यक्षाप्रत्यक्ष सामना करीत पुरोगामी विचारधारेला कवेत घेत ती व्यापक जननिष्ठेच्या पायावर स्थिर उभी असलेली दिसते. लेखकाला मानवी जीवनाविषयी प्रगाढ आस्था आहे. या जीवनाबद्दल असलेली त्याची बिलक्षण निष्ठा या निर्मितीत दिसून येते. अनुभवांबद्दल त्याच्या ठायी असणारी अव्यभिचारी प्रीती व ग्रामजीवनात त्याला जे अनुभव आले ते उत्कटतेने मांडण्याची प्रबळ लालसा तथा असोशी इथे प्रकर्षाने जाणवते. या प्रकटीकरणात कुठेही आत्मप्रौढी नसून व्यापक समाजजीवनाचे यथार्थ आकलन/दर्शन मांडण्याची प्रेरणा इथे अद्याहत असलेली दिसते. 'स्व' व 'स्व-कुटुंब-समाज' यांत अडकून न राहाता समग्र समाजजीवनाकडे पाहाण्याची व्यापक दृष्टी यातून प्रतीत होते. कष्टकी ग्रामीणांबद्दल असयणारा अकृत्रिम कळवळा व त्यांच्या उत्थानाची प्रबळ तळमळ इथे
स्पष्ट दिसते. या जीवननिष्ठ आस्थेमधूनच अमरावती जिल्ह्यातील चांदस वाठोडा या गावपरिसरातील
अधःस्तरीय-दुःखी, वंचित समाजाचे मूलभत प्रश्न व त्यांचे विभित्र कंगोरे लेखकाने कलात्मकतेने अधोरेखित केले आहेत. द्वारका या विधवा स्त्रीची व तिच्या फाटक्या संसाराची ही कथा आहे. आत्महत्या करून संकटातून मुक्त होणाऱ्या नवऱ्याच्या पश्चात तिने प्रतिकूलतेशी दिलेली झुंज
येथे आविष्कृत झाली आहे. तिचा मुलगा शिरप्या लहानपणापासूनच एक समंजस विवेकशील मुलाग म्हणून स्वतःला घडवतो. संकटावर मात करीत एम्. एससी. पर्यंत शिक्षण घेतो. पण बर्तमान लक्ष्मीपूजक समाजव्यवस्थेत त्याला साध्या शिक्षकाचीही नोकरी दुरापास्त होते. तो गावात येऊन तालुक्याला ट्यूशन क्लासेस चालवतो. अशातच सभोवतीच्या समाजशील प्रश्नांची आपल्या परीने उकल करण्याचा कसोशीने प्रयत्न करतो. तरुणांना संघटित करतो. स्थानिक राजकारणाशी व तालुका-जिल्हास्तरीय राजकीय-सामाजिक गतीविधींमध्ये सहभागी होतो. भ्रष्टाचागविरुद्ध अत्यंत सजग होऊन प्रचलित व्यवस्थेचा गांभीर्याने प्रश्न विचारतो.
“भणंग' ही एका दरिद्री पण जिद्दी वैदर्भीय ग्रामीण कुटुंबाची संघर्षयाथा आहे. या संघर्षगाथेला वेगवेगळी आशयकेंद्रे आहेत. संघर्ष करीत असतानाच शिरप्याचा संबंध राजकारणी व्यक्ती सुभानराव पाटील यांच्याशी येतो. पुढे सुभानरव आमदार म्हणून निवडून येतात. हा होतकरू कर्तृत्ववान मुलगा आपल्या मार्गात अडसर ठरेल म्हणून ते त्याला आपल्यातच कुटुंबाकडून गुंतवून ठेवण्याचा बेत आखतात. इथेच सुभानराबाची मुलगी उमी त्याला आपल्या प्रेमजाळ्यात ओढते. पुढे राजकीय-सामाजिक जीवनात वट वाढलेल्या शिरप्याला कायमचे संपविण्याचा कट पाटील आखतो. तेव्हा पाटलाचा दिवाणजी त्याला एक सत्य सांगतो की 'तुमचा मुलगा अपघातात गेलाच आणि आता तुमचाच वंश असलेल्या ह्या मुलालाही तुम्ही संपवणार का की आपण अत्याचार केलेल्या अगतिक द्वारकेच्या पोटी आपलेच बीज शिरप्याच्या रूपाने जन्माला आले हे त्याला माहिती नसते. दिवाणजी ही गोष्ट भावनाभरात द्वारकेलाही सांगतो की नात्याने बहीणभाऊ लागणाऱ्या उर्मी व शिरप्याचे शारीरिक संबंध आहेत. या धक्क्याने द्वारका आत्महत्या करते. उर्मीचे दुसऱ्याशी लग्न होते पण ती वेडी होते इतकी की ती दुरुस्त होण्याच्या पलीकडे गेलेली असते. पुढे शिरप्याला एका कनिष्ठ महाविद्यालयात नोकरी मिळते पण या स्थानी येईपर्यत तो सर्वार्थाने 'भणंग' झालेला असतो. असे हे कथानक आहे.
ही कादंबरी जशी वास्तवाभिमुख आहे तशीच ती जीवनमूल्य दर्शन घडविणारी, जीवनातील संगती-विसंगती टिपणारी व व्यामिश्र जीवनजाणिवा प्रकट करणारी कादंबरी आहे. कलात्मक जीवनर्चितनाचा एक पदर या कलाकृतीत अध्यादहत असलेला दिसतो. समग्र निसर्गसमष्टीशी विलक्षण एकात्म झालेल्या कलावंताचे दर्शन त्यांच्या या कादंबरीतून वाचकांना घडते. वास्तव जीवनाशयाला महत्त्व देणारी तद्वतच त्याच्या कलात्मक अभिव्यक्तीलाही तेवढेच महत्त्व देणारी ही साहित्यकृती आहे.
प्रमोद चोबीतकर यांच्या 'भणंग' कादंबरीतील वैदर्भीय जीवनवास्तव अनेक दृष्टींनी महत्त्वपूर्ण वाटते. या कादंबरीतील प्रदेशविशिष्टता पूर्वसूरींपक्षा निश्चितच वेगळ्या दर्जाची आहे. या कादंबरीतील व्यक्तींचा विचार भोवतालच्या प्रादेशिक पर्यावरणाला वगळून करताच येणार नाही. इथे प्रादेशिकता ही केवळ पार्श्वभूमीसाठी उपयोजिली नसून वैदर्भीय जीवनवास्तवाच्या आविष्कारार्थ अपरिहार्यपणे आलेली दिसून येते. स्वतंत्र, स्वाभिमानी, स्वायत्त असे प्रतिष्ठित माणूसपणाचे जिणे जगण्यासाठी धडपडणारा नायक शिरपा व त्याच्या मार्गात येणारी अगणित संकटे यांचे दर्शन या कादंबरीतून घडते. अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा घेऊन अथक परिश्रमशीलता जपणारा शिरपा व त्याचे जगणे इथे चित्रित झाले आहे. त्याच्या व्यक्तिमत्वाच्या चित्रणाच्या निमित्ताने विजिगीषु वृत्तीचा कलात्मक आलेख लेखकाने 'भणंग' मधून मोठ्या आत्मविश्वासाने व आत्मीयतेने निर्माण केला आहे. सकारात्मक परिवर्तनसम्मुख वृत्तीचा व अभंग आशावाद जपणारा प्रस्तुत कादंबरीचा नायक शिरपा त्याच्यातील गुणदोषांसह उभा करण्यात कादंबरीकार यशस्वी ठरला आहे.
अध:ःस्तरीय ग्रामीण-शोषित व संधीवंचित जीवनाबद्दल वाटणाऱ्या कळवळ्यातून ही रचनाकृती सिद्ध झाली आहे. 'भणंग' ही एका ग्रामीण शोषित समाजाचा प्रतिनिधी शिर्पा व त्याच्या भोवतीच्या समाजजीवनातील वास्तवाला जननिष्ठ जाणिवेतून कलात्मक आकार देणारी कलाकृती आहे. या रचनाबंधाच्या निमित्ताने लेखकाची प्रगाढ आणि प्रमाथी अशी जीवननिष्ठा प्रकट झालेली दिसते. या कलाकृतीमध्ये कलावंताची जननिष्ठ जाणीव वैदर्भीय संधीवंचित समस्याग्रस्त ग्रामीण कास्तकार व त्यांचा प्रतिनिधी असलेला कादंबरी नायक शिरपा व विपरीत परिस्थितीशी त्याच्या लहानपणापासा[न सुरू असलेल्या संघर्षावर स्थि झाली आहे. या कादंबरीच्या पूर्वार्धात संकटप्रस्त-दुःखी द्वारका केंद्रस्थानी तर उत्तरार्धात तिचा मुलगा शिरपा केंद्रस्थानी येतो. या दोन व्यक्तिरेखांच्या अनुषंगाने अनेक पात्रांच्या द्वार विविध गतिविधींची गुंफण साधत जननिष्ठ प्रेरणेतून लेखकाने सकस असा जीवनाशय या कादंबरीतून आविष्कृत केला आहे. शिवराम, द्वारका, सासरा कुशापा, बाप केरबा, शिरपा, यमी, गणपत म्हाली, वेडी सावित्री, मंजुळा, किसनाबुढी, सायबूकाका, भुजाडे भाऊसाहेब, जर्योता जिजी, झिबलाबुदी, जाइन्हाबुढी, सुभान पाटील, दिवाणजी, वेडा मारोती, खाडे गुरुजी, गायकी गुरुजी, वामन वाढी, शंकरराव, यंकटराव, चंपा, उर्मी व शिरप्याचे मित्र अशी अनेक पात्रे प्रसंगपरत्वे लेखकाने उत्तम तऱहेने रेखाटली आहेत. 'भणंग' मधील समाजचित्रण त्याच्या सनातन जनश्रद्धांसह अभिव्यक्त झाले आहे. कुसाबाचा डोह, होळीचे मैदान, भारलेली देवी, पोळ्याचा सण, झडत्या, मारोतीचे मंदिर, दारी येणारी ज्योतिषी, गायी-बैल-कुत्रे-कोंबड्या-बकऱ्या हे प्राणीपक्षी व या सर्व संदर्भातील गावकऱ्यांचे संस्कृतिनिष्ठ असे वर्तन-विचार प्रदर्शन सहज उतरले आहे.
लेखकाने जननिष्ठ जाणिवेतून स्वतःला गवसलेला जीवनाशव प्रभावी पद्धतीने इथे आविष्कृत केला आहे. हा जीवनाशव प्रत्यक्ष अनुभवातूनच लेखकाने उचलला आहे. तसाही कलाकृतीतील आशय म्हणजे लेखकाचा अनुभवच असतो. हा अनुभव अर्थातच प्रत्यक्ष जीवनाचा असतो. सभोवतीचे निर्जीव वस्तुजात, मानवतेवर प्राणी आणि मानव या तीन जीवनघटकांशी लेखकाचा जो संबंध येतो त्यातून त्याला जीवनाचा अनुभव मिळत असतो. हे जरी खो असले तरी मानवी जीवनाचा अनुभव हाच बहुतांश सहित्याचा पाया बनलेला दिसतो आणि अशाच भाभक्कम पायावर 'भणंग' उभी आहे. ही एक वास्तववादी कलाकृती आहे. केवळ 'ग्रामीण' या विशेषणाने तिच्याकडे अंगुलिनिर्देश करणे योग्य ठरणार नाही. कारण 'ग्रामीण' हे साहित्याचे केवळ वर्णनात्मक विशेषण नसून ते साहित्यांतर्गत अभिव्यक्त होणारा वैशिष्ट्यपूर्ण भाषिक उद्गार ज्या साहित्यामध्ये एकपिंडत्वाने, संवेदनशीलतेच्या पातळीवा जिवंत-वास्तवदर्शी उमटतो त्या साहित्याला ग्रामीण जनजीवन कवेत घेणारे जनसाहित्य म्हणावयास हवे. जनसाहित्याच्या कसोटीवर प्रस्तुत कादंबरीचे परीक्षण करता जनजीवननिष्ठ, जनश्रद्धा, जनभाषा, जनप्रबोधकता या विविध मुद्यांवर ही कादंबरी महत्त्वाची असल्याचे लक्षात येते.
प्रस्तुत कादंबरीचा नायक शिरप्या/श्रीपत इंगळे की ज्याने स्वत:चे नाव मित्र िल्ली उडवतात म्हणून श्रीकांत इंगळूदकर करून घेतले तो ग्रामगीतेवर नितांत निष्ठा/श्रद्धा ठेवणाश, गाडगेबाबांच्या विचारांची कास धरणारा परिवर्तनोन्मुख तरुण आहे. तुकडोजींचा विचार घराघरात पोहोचविण्याचा व जनजागृती करण्याचा त्याचा मानस आहे. चिंतनाच्या ओघात लेखकाने आजचे सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक क्षेत्रातील प्रश्न चर्चेला घेतले आहेत. वाढती बेरोजगारी, महागाई व सर्वत्र राजकीय हस्तक्षेपाने आलेली बाकालता हाही लेखकाच्या चिंतनाचा भाग आहे. खासगी कृषिसेवा केंद्रातही चालणारा भ्रष्टाचार व कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधून होणारे गैरव्यवहार (पृ.२४४) यावरील चिंतन कृषिवलांविषयी वाचकाला विचाखवृत्त करते. 'शेवटचा श्वासही तो याच मातीत आणि मातीसाठी घेतो" (पृ.२३५)- हे शतकऱ्यांबद्दलचे चिंतनही असेच मूल्यात्म आहे. रुमाल टाकून भाव साधणारे दलाल व तदनुषंगिक कृषिचितन (पृ.२३२), विषमतेवरील ज्वलंत भाष्य (पृ.२३४) असेच अर्धघन स्वरूपाचे आहे. विकासाची गंगा गावात अवतीर्ण करू पाहाणाऱ्या शिरप्याचे परिवर्तन-प्रेरक व्यक्तिमत्व सर्वांगांनी उभे करताना कादंबरीकाराने गोवर्धन पर्वताला स्पर्शिणाऱ्या कृष्ण करंगळीचा आदिबंध विलक्षण कलात्मकतेने उपयोजिला आहे. (पृ.२२७). शाश्वत शेतीबद्दल शिरप्याच्या मुखी घातलेले चिंतन (पृ.२४५) असेच परिवर्तनसम्युख करणारे आहे. एकूणच प्रस्तुत कादंबरीतून शोषितांची आत्मजागृत परिवर्तनोन्सुख मानसिकता कलात्मकतेने अघोरेखांकित झालेली दिपून येते. 'बळीराजा संघर्ष समिती स्थापन करून कार्य करणारा शिर्पा, तारुण्याच्या उंबरठ्यावर जगाचे दारुण अनुभव घेणारा शिर्पा, नदीजोड प्रकल्प-विपणन व्यवस्था-संघटित होण्याची आवश्यकता यावर भर देणारा शिर्पा-अशी अनेक रूपे प्रस्तुत रचनाबंधात वाचकाला पाहावयास मिळतात. झिरो बजेट शेती, संकटातही संधी शोधणारी तरुण पोरे व राजकारणी, नोकऱ्यांचे वर्तमान वास्तव, गरीबांची सर्वस्तरीय थट्टा अशा अनेक विषयांना प्रस्तुत कादंबरीने स्पर्श केला आहे.
वेड्या सावित्रीवर मातृत्व लादणारा, दिवाणजीच्या भाचीवर व द्रारकेसारख्या अनेकींवर अत्याचार करणारा सुभान पाटील हे वासनांध मस्तवाल वृत्तीचे प्रतीक म्हणून कादंबरीत आले आहे. केरबा-कुशापा-शिवराज-द्वारका व शेर्पा हे एक आशयर्केंद्र, सुभान पाटील व राजकारणी वर्तुळ, विधवा सुनेचा भोग घेत तिच्यावर मातृत्व लादणारा व परत तिलाच कुलटा ठरवू पाहाणारा भटजी हे दुसरे आशदकेंद्र, गावकी व त्यांच्या जनश्रद्धा हे तिसरे आशयकेंद्र आणि वर्तमान सामाजिक-राजकीय परिस्थिती हे चौथे आशयर्केद्र सेंद्रिय पद्धतीने एकमेकांत एकात्म संबंध आहेत. असंभाव्य, अतर्क्य गोष्टीही आयुष्यात घडत असतात याचेही दर्शन व त्याआधी पताकास्थान घेणारे त्याचे कलात्म सूचन या कादंबरीत आलेले आहे. वैविध्यपूर्ण प्रतिमा, प्रतीके, प्राक॒था, सांस्कृतिक सणसमारंभ, रीतीरिवाज, जनमन, जनश्रद््धा, जनाकांक्षा या घटकांची कथाशयाशी कलात्मकतेने गुंफण साधण्याचा प्रयत्न कादंबरीकाराने प्रभावीपणे केला आहे. वऱ्हाडी भाषेची नजाकत, संवादातली सहजता, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व वैराग्यपूर्ती 'गाडोबाबा यांच्या वाटेवर चालू पाहाणारे जनमानस याचीही नोंद गांभीर्याने घेण्याचा यत्न लेखकाने केलेला आहे. शिवधनुध्याचा टणत्कार, कृष्णकरंगळीचा स्पर्श, कालीमातेचे रूप घेऊन पंचायतीच्या सांगण्यावरून शीलावर घाला घालणाऱ्या सासऱ्याच्या-भटजीच्या श्रीमुखात खेटां मारणारी सून यांतून सनातन जनश्रद्धा-आदिबंधच दृग्गोचर होतो. घमेल्यात पाणी टाकून आभाळातल्या चंद्रबिंबाच्या प्रतिबिंबाला हाच तुझा मामा चांदोमामा...असे हट्टी द्वारकेला सांगणारा बाप, गायीच्या गोमूत्रात मेडशिंग उगाळून शिवरामच्या दुखण्यावर लावणारी द्वारका, मुसळखेड्याच्या यशवंत बाबांवर श्रद्धा ठेवणारे भाळेभाबडे लोक, भजनात रमून संसारताप सुसह्य करू पाहाणारा केरबा, सर्पाचा स्वप्नदृष्टांत व त्यातून द्वारकेने केलेली शंकरासाठीची सोमवारची कढई, रखवालीचं काम करणारा व सेवा करणाऱ्या सून-द्रारकेत माय शोधणारा सास ही सर्व जनश्रद्धेची, जनसंस्कृतीची विविध रूपे इथे कलात्मकतेने अवतरली आहेत. आशय-आकृती अद्वैताची मनोरम प्रचीती या साहित्यकृतीतून वाचकाला येते. अस्सल अनुभवग्रंथींना या कादंबरीत प्रधान स्थान लाभलेले आहे. निर्मितिप्रेरणा कृतक-जीवनदर्शनाची नाही तर जीवनाशयाचे आवाहन म्हणूनच फक्त कथानक, पात्रचित्रण, वातावरण या बाबींकडे लेखकाने लक्ष पुरविले आहे. सनातन मानवी सत्त्वाचा शोध घेणे आणि या निसर्गसमष्टीशी असलेला मानवी संबंध शोधणे; तद्वतच निसर्गसमष्टी, परगेष्टी यांच्याशी मानवेतर सृष्टीचा असणारा संबंध शोधीत त्याचे अंतरंग निरखणे ही सुद्धा कादंबरीकाराची प्रेरणा दिसते. स्थितिशील जीवन जगणारी तशीच गतिशील आयुष्य जगणारी पात्रे साकार करण्यात लेखक इथे यशस्वी ठरला आहे. जीवनाचा विविध पातळ्यांवर शोध घेताना गवसलेले अनुभवसत्य जननिष्ठ जाणिवेतून वास्तवाधिष्ठित जीवनदर्शनाच्या प्रेरणेने भारावून जाऊन मोठ्या सामर्थ्याने आविष्कृत करण्याचा हा प्रयत्न आहे. 'कादंबरीकाराचे अस्तित्व समाजसापेक्ष असून समाजातील समूहाच्या जाणिवा त्याला व्यक्त कराव्या लागतात'- ही अपेक्षा पूर्ण करणारी ही रचनाकृती आहे. वाचकाच्या जाणिवांना संस्कारित करण्याचे व त्यांच्यात परिवर्तनकारी विचार संक्रामत करण्याचे सामर्थ्य या कादंबरीला लाभले आहे. लेखकाची भूमिका ही यथास्थितीवादी नाही तर ती परिवर्तननिष्ठ स्वरूपाची आहे आणि या परिवर्तननिष्ठेला कृतिशील-पुरोगामी विचारांचे भर्जरी अस्तर जोडले गेले आहे. अपवाद उर्मींच्या मोहाने क्षणैक आंधळेपणाने वाहवत जाण्याचा प्रमाद नायक शिरप्याकडून घडतो व तो त्याच्या बावन्नकशी नायकत्वाला लांच्छन लावणारा वाटतो. तरीही गुणदोषयुक्त 'माणूस' ही संकल्पना मान्य करून जीवननिष्ठा व जननिष्ठा या द्विदल बंधातून समजाच्या अंत:शक्ती संस्कारित करण्याच्या प्रक्रियेला देऊ केलेले या रचनाकृतीचे योगदान निश्चितच महत्त्वाचे आहे. म्हणून “भणंग' चा उत्तम जनकादंबरी म्हणून गौरव करावा वाटतो.
डॉ. निरंजनमाधव अंजनकर
प्लॉटनं.१६, वर्षा अपार्टमेंट, सदाचार सोसायटी, दत्तवाजी, अमरावती मार्ग,नागपूर-४४००२३
अक्षसैदर्भी । एप्रिल/मे/जून-२०२०
कादंबरी: भणंग
लेखक: प्रमोद बाबुराव चोबीतकर (https://www.facebook.com/pramod.chobitkar.5)
प्रकाशक: लोकवाङमय गृह
स्वागत मूल्य: 310/- रुपये फक्त
https://www.akshardhara.com/en/kadambari-sankirn/32008-Bhanang-Pramod-Chobitkar-Lokvadmay-Grih-buy-marathi-books-online-at-akshardhara-9789382906421.html
Comentários