आंतरराष्ट्रीय चहा दिनाच्या निमित्ताने....
टपरी वर म्हणा किंवा ऑफिस कॅम्पस मध्ये म्हणा , सो कॉल्ड आयुष्याचे निर्णय घेतले जातात त्यांचा एकमेव साक्षीदार म्हणजे "चहा" , अस म्हंटल तरी काही वावग ठरणार नाही. मित्रांचा भेटायचा बेत ठरला तर चहा च्या कट्ट्यावर . लग्नासाठी मुलगी बघायचा कार्यक्रम असला तर चहा हा मुख्य विषय . सरकारी कामकाजात चिरीमिरी ला सुध्दा चहापाणी अश्याच एका पर्यायी शब्दाने बिनधास्त पणे बोलल्या जाते. जर मित्राने विचारल की ,"चल ,चहा मारून येवू " , तर "जास्त नाही घेणार वन-बाय-टू करू" असे उद्गार आपसूक तुमच्या तोंडून निघत असतील , तर बेशक तुम्ही माझ्यासारखेच चाहाबाज आहात . चहा ची किंमत किती ही वाढली तरी चहाप्रेमी काही कमी होणार नाहीत , हे ही तेवढंच सत्य. मित्रांच्या घोळक्यात कुणी चाहाऐवजी कॉफी ची ऑर्डर दिली तर त्याची तेवढीच कीव वाटते. कारण , चहा मधून मिळणाऱ्या स्वर्गसुखापासून हा व्यक्ती कदाचित वंचित राहला असावा.
ऑफिस मध्ये हातात चहा चा ट्रे घेवून येणारा ऑफिस बॉय रोज मला एखाद्या देवदूता समान वाटतो . जणू मुर्छा येवून पडलेल्या लक्षमनासाठी संजीवनी बुटी घेवून हनुमान पुढ्यात यावेत , आणि ज्या कपामध्ये जास्त संजीवनी भरून आहे तो कप माझ्या पुढ्यात ठेवावा. अशी काहीशी गोड समजूत माझीच मी करून घेतो. रोजच्या दैनंदिन व्यवहारात चहा एक उत्तम साथीदार म्हणून भूमिका बजावत असतो , तुमच्या रोजच्या ऑफिसच्या व्यापा मध्ये , तर कधी कंटाळवाण्या वाटणाऱ्या प्रवासामध्ये तुमच्या नेहमी सोबत असतो.
देव - देवतांना जर हा एवढा व्याप असता तर त्यांना अमृत मंथनाचा नाद सोडून चहा चां नाद लागला असता. शिवाय , चहा ला ' अमृततुल्य ' हे पर्यायी नाव मला पुण्यात आल्यावर च कळलं . आणि ते तेवढंच साजेस आणि पूरक मला तरी वाटते. कारण दिवसभराचा जो शीन चहा च्या एका घोटाने दूर होतो , ही ताकत कोणत्या दुसऱ्या पेयामध्ये कदाचित च असावी. चहा बद्दल एवढं सर्व लिहल्या नंतर एक वाक्य मात्र पुरेपूर वाटत , " चहाला वेळ नसतो , पण वेळेला चहा मात्र पाहिजे ..! "
ऋषिकेश गावंडे पुणे १५-१२-२०१९ आंतरराष्ट्रीय चहा दिन
Comments