top of page

अशाच एका दुपारी

Updated: Feb 9, 2021



अशाच एका दुपारी आपण शेतातून घरी येतो. गल्लीवर पोरासोरांची गर्दी दिसते म्हणून जागीच थबकतो. गर्दी पुढं पुढं सरकत जाते, आपणसुध्दा तिच्यात मिसळून समोर सरकू लागतो. गर्दी अंगणात जाताच थबकते. कडेवरच्या माठातील पाणी हिंदकळावं तशी गर्दी हिंदोळते, आणि सूर ऐकू येतो.


"घरी आला भाट

त्येचा येगळाच थाट

नोका पाहू वाट

आता जेवाले आणा ताट..."

हे शब्द कानी पडल्याबरोबर परसाकडेचा तांब्या घेऊन जाणराही वापसी फिरतो. तोवरी भाट ओसरीत जाऊन बसकन्‌ मांडून बसलेला असतो आणि खांद्यावरच्या दुपट्टयानं वारा घालीत सूर काढतो.

'पाणी ' अंगणातील गर्दी खुदकन्‌ हसते.

'आज्ज्ये '

बुढीचा लहानगा नातू फुशारकी मारीत आवाज देतो. आजी कधी घरात असते कधी नसतेही. अशावेळी तोच दुडक्या चालीनं घरातून पाणी आणतो. पाणी पिल्यावर त्याच्या जिवात जीव येतो. बकरीच्या गोठयातील झाडझूड झाल्यावर हातपाय धुवून मांडीवर हात कोरडवत आजी ओसरीत येते. तिच्याकडे पाहत भाट म्हणतो.

' तुमच्या घरी पोरगा झाला ना'

' हूड...माह्या घरी नाय बा झाला लेक ' बुढी पहिल्याचं स्ट्रोकमंधी त्याला धुडकावते.

' वा....वा...असं कसं म्हंतं मोठीमाय, आमाले तं तिकडेच समजलं ' तो असा बोलतो, कां जसा त्याले टेलिफूनच लावला होता. साईडमंधी ठेवलेलं त्याचं दप्तर समोर ठेवत म्हणतो.

' मोठीमाय, आमी खोटं नाय बोलणार, धा मुलखातली गोठ नाय लपत आमच्या कानावरून "

इतक्यात तसं काहीच झालं नसतं. जुनं काही बुढीले आठवलं नसतं. तितक्यात बुढीचा नातू बुढीकडे पाहत म्हणतो.

' मांगलदिसा पोर्ग न्हई झालं कावं बईले, थ्ये म्हनत असंन तं कोन्जानं '

बुढीले आधीच भाटगिरीचा कंटाळा येता. त्यात तिले कामाले जायची, नाहीतर लगनघरी जायची घाई असते. नातवानं गोठ फेकल्याबरोबर तो वरच्यावरच झेलतो.

' म्या खोटं नाय बोलणार मोठीमाय. '

नातवाकडे पाहत आजी बोतते.

'थ्या गोस्टीले तं आत्तं धायेक मयने झाले रे '

' झाला ना बस तं मंग ' असं म्हणत तो हक्कानं गाठ सोडतो. त्याच्या मागंमागं आलेलं येटायातलं पोरासोराचं लेंढारं दारापाशी सपरीले चिपकतं. आपण दारापाशी उभे राहूनच भाटगिरी पाहत असतो.

'तिथी काढत बसलं थ्ये जुने मुर्दे उखरून.'

असं म्हणत बुढीनं नातवाले टोला मारते. आपल्यावरची बला चुकवत फुशारकी मारत नातू म्हणतो.

' काहो भौ, आत्तं सहाक मयन्या अदूगर आला व्हता एक भाट '

'थ्ये भाट न्यारे, आमी न्यारे, आमची फेरी बारा वर्सातून एकदाच.., बारा वर्साअगूदर...'


तितक्यात नातवाचा बाप बाहेरून आत येतो, तशी दारातली गर्दी हलते. मोरासारखे पाय उचलीत बाप ओसरीतल्या खाटेवर टेकतो. आता मुद्याचं माणूस भेटलं आयकाले, आता झाली कामाची गोठ... असं समजून त्याच्याकडे पाहत भाट म्हणतो.

'बारा वर्साअगूदर तुमच्या आबानं आमच्या आबाले दुभती म्हैस देल्ली होती '

' दुभती म्हैस..बापरे.., '


नातवाच्या तोंडून आश्चर्य बाहेर पडतं. त्याच्या मनात एकच एक येतं ' कां आत्तं तं आपल्याच मायले साधं एका सडयालेही शेण आणा लागत्ये दुस-याच्या घरून, आन्‌ आपल्या आबानं दुभती म्हैस ' त्याच्या तोंडाले पाणी सुटतं. पण त्याच्या आवाजानं तंद्री भंगते.

' दुध खाले देल्ती, मज्जा आली भई, पण थ्याच म्हशीपायी आमचा आबा गेला. '

नातवाचा बाप म्हणतो.

'म्हंजी मी नाय समजलो...? *

'आमच्या आबाचा भारी जीव तिच्यावर... रानात गेला म्हैस चाराले, चरता चरता भुजाडली ना म्हैस, आबाजीनं पाह्यलंतं सर्पच तिच्या पायाले गुंडलेला., बसं झालं, म्हैस गेली ना पान लागून. नातवाच्या ध्यानी आलेलं नाही हे हेरून तो पुन्हा म्हणतो.

' टाक.., नाय समजेल, सर्पदंस... ' नातवाच्या बापाकडे पाहत म्हणतो. ' कितीक कोंबडया लावल्या पण उमजलं नाय जनावर, गेली बिच्यारी देवाघरी, काय सांगू भौजी तुमाले ' नातवाच्या बापाकडे पाहत पुन्हा बोलतो.

'थो सरप, नाग होता नाग, ह्या अस्सा. ' म्हणतच पायाची पोटरी समोर करून धोतराचा सोगा वर ओढतो.'

'भारी भर्रकन्‌ जनावर, नजर न्हय ठह्यरे म्हंते, पाणी न्हय मांगू देल्लं, झालं राजेहो., तिस-याच दिशी आमचा आबा गेला म्हंते हाय खावून ' त्याचा आवाज ओला झालेला असतो. हात सहजच डोळयाकडे सरकतो. डोळे पुसतच तो म्हणतो.

'तईपासून जनावर घेत न्हय भौजी आमी '

' चांगलं आहे. '

नातवाचा बाप बोलतो.

तो म्हैसपुराण आटपतं घेतो, गाठोडयातल्या लाल वह्या काढतो आणि आपलं भाटपुराण सुरू करतो.


' चंदनगढी घराणे वसे, राज्याच्या हाती परधान जसे, त्यांना पाच पुत्र आणि चार पुत्री असती, भाटाला हि-याची अंगूठी आणि गाई दिल्या असती, आणिक घराणे किर्त पावले, मोठी जोधाबाई, सोनाबाई आणि धाकटी चिमणाबाई, एक बाळतपणातच मेली. सा-या सुखात नांदल्या. पाचातले चार लढाईत गेले, उरला एक त्याचा वेल वाढला. कोंडीबाचा धोंडीबा झाला, धोंडीबाचा नागोबा झाला, नागोबाचा तानबा झाला, तानबाचा सिताराम, सितारामचा न्यानबा आणि मास्तरबा, मास्तरबाचा दुसरा फाटा, त्येले रामराव, शामराव, धुरपदी, जानकी, निर्मला अशी प्राप्ती झाली. न्यानबाले चार पोर एक पोर्गी. जयवंता,

गुणवंता, बळवंता, शांताराम आणिक मनकर्णाबाई. बाकीचेही वेल वाढले पण ह्या जयवंताबाचा फाटा, तुमच्या न्यानबानं म्हैस भाटाले दिली असे, पुढे वंश वाढीले लागला असे '

' कोन्तं ठेसन व्हये गा... नाप्पूर आकाशवाणी कां विविधभारती ?'

रस्त्यावरुन आपल्या कामाच्या घाईत जाणारा एखादा वेळात वेळ काढून थोडासा डोकावून हे भाटपुराणं सुरू असतांनाच अंगणातूनच विचारतो.

'ठेसन न्हई व्हये, भाट व्हये भाट ' तिथं हजर असणारा एखादा माहिती पुरवतो पण भाटबुवाचं सुरूच असतं.

' आणि आता पुत्र जाहला, जो तुमचा नातू, असाच वंश वाढो एकाचे एकविस होवो, पाचाचे पन्नास होवो, वेल मांडवावर जावो, सारे सुखात नांदो '

रस्त्यावरून डोकावणारा मधातच त्याला टोकतो.

'काहो भौ, ह्या भाटगिरीचं टेरनिंग कुठंसा हाये ? '

' ओ भौसाब, थट्टा करता काय ?, आडनाव काय हाये तुमचं ? '

डोकवणारा आपलं आडनाव सहजच सांगून टाकतो.

' खाडे '

' बरोबर हाये, खाड पडली म्हणून खाडे आडनाव पडलं '

'भलतंच कई बोल्तं राज्या, पहिलं दुसरं सोडून एकदम तिसरंच '

'तसंच आहे थे, त्याबिगर काय असं नाव पडत्यात. '

तो लाल कापडाच्या दोन तीन वह्या काढतो. त्यातील एकीचा पन्ना पलटवून म्हणतो.

' ह्येच्यात पाहा पस्टंच हाये रायटींगमंधी लिव्हलं ' थांबून म्हणतो. ' तुमच्या पणज्याच्या पणज्यानं जेवाले सांगतलं व्हतं बामानायले, पंचपक्वानाचं जेवण केल्तं, कढी, दुध, भात, लाडू, बुंदी, पुरी सारं सारंच होतं, पण ऐन वक्‍्तावर तूप पडलं कमी, बामण उठून चाल्ले गेले अर्ध्यातूनच, म्हंजेच तुपाची खाड पडली व्हती आणि तेव्हापासून तुमचं आडनाव खाडे पडलं ,समजलं ?'


' काय लेक बुवा, माना लागंन तुई हुशारी, सारे नाव काय त्याच ठुवले काय गा ? '

' अर्थातच.,दुसरं ठेवणार कोण म्हना भाटाबिगर,कोणी तितरं मारलं त्याचं तितरमारे, कोणी मुंगवांगे खाता खाता त्याचं मुंगवांगे, मडकं चोरतानी सापडला त्याचं चोरघडे, उघडा दिसला त्याचं उघडे, चोरी करतानी दिसला त्याचं चोरे, भांडखोर असला त्याचं भाडे, असं असत्ये थ्ये '

' कईबी..., आपल्याच हातंच लावतं राज्या ' नातवाच्या बापाकडे पाहत म्हणतो.

' बोला भौजी काय नाव मांडू लेकराचं '

' शिरपती '

नव्या जमान्यातला नातू बापाले कॉस करीत बोलतो. ' हट्‌ थ्ये जुनंपुराणं सोडा आता, योगेश लिव्ह गा '

'आना पेन द्या भौजी. ' बापाजवळचाच पेन हाती घेतो आणि त्याची पट्टी सुरू होते.

' शुक्ल पक्ष वद्य नवमीला सुपत्तर जाहला, कौतुके ठेविले नाव योगेशराव, भाटाला त्याचे नावे दिले असे., सांगा काय लिहू ? '

' म्हंजे? '

' म्हंजे पोराच्या नावे भाटाला अमुक अमुक वस्तू दिली, नोंद नाय कां पाह्यजे ? '

' एकवीस रुग्ये.....आहो, शंभर रूप्ये तं नुसती व्हिजीट फी हाये आमची '

“काय ? '

माशा मारल्यासारखा तोंड करून म्हणतो.

' एकवीस रुग्ये.....आहो, शंभर रूप्ये तं नुसती व्हिजीट फी हाये आमची '

' बापरे.., शंभर रुप्ये व्हिजीट फी, एव्हढी फी तं डागतरची न्हई गा ? '

' डागतरात आन्‌ आमच्यात फरक वाट्टे ना '

' हौ., पण कसा काय म्हना ? '

' तुमचं एव्हढं मोठ्ठं कुटूंब, डागतर परत्येकाचाच न्यारा, पण भाट हाये कां ? '

' नई'

' मंग बोला काय लिहू ? '

' सांगतले ना एकविस रुप्ये '

' काय राजेहो.

' एकविस रूप्ये बस झाले आता, तिदस्ता एक भाट आल्ता, त्येलेबी एकविसच रूप्ये देल्ले व्हते *

'थ्ये भाट न्यारे, आमी न्यारे, आमी बारा वर्सातून एकच डाव येतो, तपाच्या तपाले, गेल्या साली एका साहेबानं मले सनी कां मनी गाडी देल्ली *

' गाडी... माह्याजोळ न्हई बा गाडी ना घोडी, इंथं तं बंडीच्या चाकाले वंगणाचा ईच्यार हाये, त्येत माह्याजोळ कायले नांदते गाडी ना घोडी. सायकल हाये आपल्याजोळ, गरिबी गरिबी काम हाये आपलं... सिंपलमंधी साधं '

' मंग असं करा देऊन टाका '

' काय सायकल ? '

' दचकले कां ?, हे तर काहीच नाय, रामराव दाजीनं आमच्या आबाले हत्ती देल्ला होता, माह्या आजीले चोयी बांगडी आन्‌ लेकरायले कपडेलत्ते *

' हे पाहा भाटबुवा सायकल सोडून दुसरं कई मांगा, सायकल तं पोरालेच पाह्यजे, सायकल चालवा जोक्ता झाला ना थ्यो ' नाही म्हणायला बापाच्या या बोलण्यानं नातवाला आनंद होतो.

' मंग घड्याळ द्या '

' न्हई हो जरा मुद्याचं बोला, वाटल्यास जेवण करा. '

' त्याबिगर काय जाणार हाये, बरं झालं बायकोले नाय आणलं '

' बरं केलं तुमीच आल्ये '

'पुढच्याखेपीनं आणतोच '

' पुढच्याखेपीत म्हंजे ? '

' नेक्स्ट टाईम '

' पण तुमी बारा वर्सातून एकच डाव येता ना ? '

' तुमी म्हणसानं तं सकायच येतो '

'न्हई, बारा वर्सानंच या, एखांद्या वक्ती गॅप देल्ला तरी चाल्ते ' त्याच्या या बोलण्यावर आतापर्यंत चूप असलेला डोकावणारा न राहवून नाक खुपसतो.

'अहो भाटबुवा तुमी मुशाफीर मान्सं, ह्या गावचं थ्या गावी, आज हिथं तं उद्या तिथं, थांग ना पत्ता, तुमाले कायले पाह्यजे हो एव्हढा लोभ, संग पोर ना सोर जिवाले घोर '

' तुमाले काय वाटतं, आमी बाराही महिन्ये फिरतीवरच असतो ? पेशल गा हाये आमचं तिकडे... जळगाव साईडनं '

' ह्ये पाहा, एक्केच्याईस घ्या, आन्‌ वाट धरा. ' नातवाचा बाप खवळतो तसा भाटबुवा नरमतो.

' तुमी काय थ्ये पोराच्या बापालेच मांगजा, हे घ्या '

खिशातून वीसच्या दोन को-या करकरीत नोटा आणि बांडीच्या खिशातून एक बंदा कलदार काढून त्याच्या हाती ठेवत म्हणतो.


नातू को-या नोटांकडे पाहत राहतो. त्याच्या मनात येतं. ' चड़या, बनेना फाटल्या माह्या, आन्जा म्हतलं व्हतं तं पैसे न्हई म्हने माह्याजोळ आन्‌ आत्तं, कावून बावा आपल्याले घ्यून देल्ल्या नसंन म्हना. '


तो मनातल्या मनात नुसताच विचार करीत राहतो. पैसे घेऊन आपला सोटा दुपट्टा गुंडाळतो आणि रामराम करीत चालू लागतो. आपणही नकळत त्याच्या पाठमो-या आकृतीकडे पाहत राहतो.


 

- प्रमोद बाबुराव चोबीतकर

 

Dupar | Bhat | Pramod Chobitkar | Jewan | Pani | Dudh

160 views0 comments

Comments


bottom of page