RGDian

Jan 13, 20214 min

बेलनदी

Updated: Sep 7, 2021

मध्यप्रदेशात उगम पावून महाराष्ट्रात वर्धा नदीच्या कुशीत विसवणाऱ्या बेलनदीच्या काठी वसलेलं हे एक पुरातन असं खेडं आहे चांदस - वाठोडा नावाचं. बदलणाऱ्या काळासोबत गावही बदललेलं आहे काळही बदलला आहे. तरीही बेलनदी मात्र गावातील असंख्य कहाण्यांची, घटना-प्रसंगाची एकमेव साक्षीदार राहिली आहे ती आजतागायत. तिच्या काठाशी असलेल्या ओलसर मातीत लगटून बसलेल्या कडू-गोड आठवणींचा, कहाण्यांचा गंध अजूनही जाणवतोच. तिच्या वाळूत हरवलेलं बालपण शोधत कित्येकजण तिच्या किनाऱ्यावर आजही फिरताना दिसतात. तसं पाहिलं तर बेलनदी आठवणींच्या कहाण्यांचं चालतं-बोलतं संमेलनंच आहे. तिच्या दोन्ही काठांना कहाण्या अगदी चिकटून बसल्या आहेत. किनाऱ्यावरच्या गवतात लपून बसल्या आहेत. वाऱ्याची एखादी मंदशार झुळूक येते आणि गवतात लपून राहिलेल्या गोष्टींना आपल्यासोबत दूरवर घेऊन जाते पण तरीही गोष्टींचा कधीच अंत होत नाही.

खरेतर कहाण्या जुन्या होत असल्या तरी बेलनदीला नवेपण प्राप्त होत जाते. ग्रीष्माची वेदना पावसाने आलेल्या पुरात वाहून जाते, कहाण्या मात्र नव्या होतात. बेलनदीच्या किनाऱ्यावर नवनव्या कहाण्या जन्म घेत असतात.

वर्धा नदीच्या कुशीत आपलं अंतरंग मोकळं करणाऱ्या बेलनदीला चांगलंच परिचयाचं झालेल्या चांदस-वाठोडा या गावात प्रवेश करण्यापूर्वी तिला मुसळखेडा या अगदीच छोटयाशा गावातून यावं लागते. तशी बेलनदीच्या चालीत चंचल तरूणीची नागमोडी चाल ठासून भरलेली आहे, मात्र एवढं असूनही प्रौढ बाईचा समंजसपणाही तिच्यात आहे. रानावनातून वाहत येताना कित्येक गावांना तिनं पाणी पाजलं आहे आणि शेतांनाही. त्या दोहोतील स्नेहभावामुळे गाव आणि शेतजमिनी तिच्याशी लगट करून बसल्या आहेत अगदी तिच्या सुखदुःखात सहभागी झाल्यासारख्या.

वळणावरही वळण घेत समोर सरकलेली बेलनदी मुसळखेडयाच्या मंदिराजवळ मात्र यशवंत मुर्तीला चरणस्पर्श करण्यासाठीच जाणून-बुजून वळसा घेऊन पुढे उमनपेठच्या बजरंगबलीच्या दर्शनाला निघाल्यासारखी वाटते.

गावात प्रवेश करण्यापूर्वी धनगिरीबुवाच्या परिसरात महादेव पिंडीजवळून पुढे जाताना, आपल्याला कुणी पाहत तर नाही ना.......असा भाव मनी ठेवून घाईने चालणाऱ्या नवयुवतीच्या पायातील चपळाईही तिच्यात जाणवते. पुढे कुमाजीबुवाच्या डोहात ती प्रौढ बाईसारखी स्थिरावते. डोहातील काळंशार पाणी, आजुबाजूच्या लहानसहान व गढीकडल्या भल्या-दांडग्या झाडांनी झाकोळल्यामुळे तसेच तिच्या चालीतील मंदशा गतीमुळे ती फक्त त असल्याचा तिथे भास होतो, त्यामुळे तिथं आणखीच भयावह वाटते ती. झऱ्यातून पाणी झिरपावे तसे पाणी एकसारखे पुढे पुढे सरकत राहते.

नदीच्या अल्याड आणि पल्याड असणाऱ्या दोन्ही गावचे हितसबंध एकमेकात गुंतलेले आहेत. दोन्ही गावात देशमुखी असली तरी पंचकोशीत दबदबा होता दाजींचाच. वेगवेगळया आकारा प्रकारात नदीकाठी विस्तारलेल्या या गावात अधूनमधून भांडयाला भांडं लागून आवाज होत असला तरी इथली मंडळी मोठया सलोख्याने व गुण्या-गोविंदाने एकदुसऱ्यांशी नांदतात, हीच नदीच्या पात्रानं दोन्ही गावाला दिलेली मायेची ओल आहे.दोन्ही गावानं आपली स्वतंत्र अभिवृत्ती जपली आहे. गावात विविध जाती जमातीची लोकं एकत्र नांदतात. त्यात बव्हंशी कुणब्यांची घरे आहेत, सोबतीला चार-सहा वाणी, बामणांची घरे आहेत, चार - पाच न्हाव्यांची घरं, चार-सहा गोवारी समाजाची घरे आहेत, मांगवाडा आणि महारवाडा स्वतंत्र असला तरी कुणबी वस्तीला चिकटूनच. गावात फक्त एक, तेही गावाबाहेर शीख समाजाचं घर आहे. मुस्लीम समाजाचं घर गावात नाहीच. मोवाडच्या पुराच्यावेळी बेलनदीला आलेल्या पुरात वाहून गेलेल्या घरांचं दोन्ही गावाच्या कडांना पुनर्वसन झालं. त्यामुळे दोन्ही गावं आकाराप्रकारानं वाढलेली. आता पुनर्वसन ही नवी वस्ती म्हणूनच उदयास आलेली.

पूर्वी मोर्शी तालुक्‍यात सामावलेल्या या गावापासून तालुक्याचं ठिकाण वरूड हे आता अवघं नऊ-दहा किलोमीटरवर आहे. दोन्ही गावांना जोडणारा नदीवर मोठा सेतू बांधलेला आहे. या सेतूनं नदीचे दोन काठच नाही, तर दोन्ही गावाची मनेही जोडली आहेत.

नदीकाठावरील मातीत दोन्ही गावाच्या असंख्य आठवणी स्थिरावल्या आहेत, चिकटल्या आहेत. दोन्ही गावावर तिनं सारखीच माया केलेली आहे. सहजच रस्त्यानं चालत चालत आपण महादेव पिंडीजवळ येऊन पोहचतो. विस्तीर्ण पसरलेल्या नदीपात्रातील वाळूवरून सहज चालत राहतो. वाळूचा तो स्पर्श मनाला कितीतरी वेळ गोंजारत राहतो. वाळूवर उमटलेली आपल्या पावलांची नक्षी कळत नकळत मागे वळून आपण सहजच न्याहाळत राहतो. आपल्याला लागलेली तंद्री पाहून रस्त्यानं चालणारा

एखादा अनोळखी माणूसही सहजच आपल्याला नदीबद्दल काहीतरी सांगून जातो, तेव्हा आपल्याला जाणवतं की, काळ बदलला... दिवस बदललेत... आणि आता गावही बदलला आहे. आता पू्वीसारखं तसं काहीही राहिलं नाही. उन्हाळयातही वाहणाऱ्या या नदीला आताशा भर पावसातही पाणी दिसत नाही. मधूनच दिसते ती पात्रात स्थिरावलेली दोन-चार डबकी, त्यालाही गावातून वाहत येणाऱ्या मोरीच्या पाण्याने शोभा आणलेली. ठिकठिकाणी तिच्यावर बांधलेल्या बंधाऱ्यामुळे व आपल्याच तालात तंगडी वर करून मुतणा-या पावसाच्या लहरीपणामुळे, आणि पावसाळयातही न पडणाऱ्या पावसाच्या अनियंत्रितपणामुळे नदीला पूरही कधीमधी दिसत नाही. आताशा तिची अशीच अवस्था. नाहीतर पूर्वी बेलनदीचा पूर दोन दोन दिवस ओसरायचं नाव घ्यायचा नाही. असा मनाशी विचार करीत आपण एकटेच चांदसच्या अंगाने गावचा नदीकाठ नजरेखालून घालत पुढे पुढे चालत राहतो.

चार-सहा डबक्यांना उरी पोटी घेऊन असलेली हीच बेलनदी कधीकधी राग अनावर झाल्यासारखी बेफाम वाहते, तेव्हा ती सूड घेतल्यासारखीच वाटते. तिच्या अशा वागण्यामुळे पूर्वी तिच्या काठाशी लगट करून असलेलं गाव आताशा तिच्याशी अंतर राखून वागायला लागलं आहे. गोवाडच्या पराच्यावेळी राच्यावेळी सागराचं रूप घेऊन अवतीर्ण झालेल्या बेलनदीने जीवितहानी केली नसली तरी आपल्या मर्यादा मात्र स्पष्ट केल्या आहेत आणि तेव्हापासूनच दोन्ही गावं तिच्याशी अंतर राखून वागत आहे.

बेलनदीला पूर येतो त्यावेळी जणू ती दुसरीच नदी असते, ती कशालाही जुमानत नाही, वाटेत येईल त्याचा फडशा पाडते, तिचं पाणी फुसांडत येतं. काठ तोडतं. गावात घुसत, शेतं वाहून नेतं. किना-यावर असलेली घर दार जमीनदोस्त करून टाकतं.

यासाठी तिला कोणी वाईट समजतं का ? ती माता आहे आणि मातेलाही कधीतरी कोध येणारच. आई आपल्या मुलाला कधी चिखलातून उचलून कुशीत घेते तर कधी कुशीतून चिखलातही फेकून देते, तसंच तिचंही आहे.

पाण्यात वाहून गेलेल्या घरांचं गावाबाहेरच्या जमिनीवर पुनर्वसन झाल्यामुळे १ गावाचा विस्तार आणखीच लांब-रूंद वाढल्यासारखा झालेला आहे. तिचा किनारा आताशा ओकाबोका दिसत असला तरी वाहून गेलेल्या पाण्यात, किनाऱ्यावर आपल्याच ओळखीचे संदर्भ आजही दृष्टीस पडतात, मनाला जाणवत राहतात. तिच्या काठावरच्या वाळूत आपल्याच ओळखीचे संदर्भ शोधणारं मौन पाहून तिलाही कधीकधी गहिवरून येतं, गलबलून येतं. नदीकाठावरून आपला गाव न्याहाळताना आपल्याला हे सारं जाणवतं, काही आठवतंही आणि डोहाचं खोल-खोल गेलेलं पाणी पाहून वाटतं, की आपली वाट पाहून थकलेल्या आपल्या मायबापांचे खोल-खोल गेलेले डोळे अगदी या डोहातल्या पाण्यासारखे... काळाच्या ओघात जुन्या जीर्ण झालेल्या आणि मनाच्या कप्प्यात दडून बसलेल्या आठवणींनी आपल्याला त्रस्त करून सोडणारी हीच बेलनदी आपल्याला आज काहीतरी सांगते आहे असंही वाटतं.

पर्वतराजीच्या, घाटांच्या, हिरव्यागार गावाच्या, ऊन पावसाच्या साऱ्याच गोष्टी बेलनदीला ठावूक आहे. इतकंच नव्हे तर खोल खोल डोहात तरूण तरूणींच्या हरवलेल्या पदचिन्हांच्या स्मृतीही ठावूक आहेत. शे-दोनशे. हजारो..... किती ? नक्की नाही सांगता यायचं, पण प्रेमाच्या तर अनेक कहाण्या बेलनदी आपल्या मनात साठवून आहे. बेलनदी म्हणजे आठवणींचं चालतं बोलतं संमेलनच आहे जणू..!


- प्रमोद बाबुराव चोबीतकर



    1950
    12